गांधीनगर, पुढारी वृत्तसेवा : पुणे – बेंगलोर महामार्गावर उचगाव पुलाजवळ झालेल्या विचित्र अपघातात तीन जण जखमी झाले, तर ट्रक, कंंटेनरच्या केबीनचा चक्काचूर झाला. महामार्ग ओलांडताना दोघा पादचार्यांना ट्रकने धडक दिली. यावेळी ट्रक चालकाने ब्रेक मारल्याने पाठीमागून येणार्या दुसर्या कंटेनरने ट्रकला जोराची धडक दिली. त्यामुळे कंटेनरच्या केबिनचा चक्काचूर झाला.
बसाप्पा नामदेव चव्हाण (वय 46) व आक्काताई बसाप्पा चव्हाण (42, दोघे रा. शांतीनगर, उचगाव) हे पादचारी पती-पत्नी जखमी झाले. कंटेनरचा चालक अजयकुमार (पूर्ण नाव माहीत नाही. रा. उत्तर प्रदेश) हाही जखमी झाला.
बसाप्पा चव्हाण व आक्काताई चव्हाण हे पती-पत्नी कागलहून उचगाव येथे एसटी बसने आले. उचगाव पुलाजवळ महामार्ग ओलांडत असताना बेंगलोरहून पुण्याकडे जाणार्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. यावेळी ट्रकचालकाने जोराचा ब्रेक मारल्याने मागून येणार्या कंटेनरने ट्रकला जोराची धडक दिली. विचित्र झालेल्या या अपघातानंतर ट्रकने (एमएच 46 एचएच 4671) घटनास्थळावरून पलायन केले. मागून धडकलेल्या कंटेनरच्या केबिनचा चक्काचूर झाला. गांधीनगर पोलीस व उजळाईवाडी महामार्ग पोलीस यांनी कंटेनर बाजूला काढून जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची फिर्याद आक्काताई बसाप्पा चव्हाण यांनी गांधीनगर पोलिसांत दिली.