क्रिकेटमध्ये इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवणे हे अगदी कुठल्याही फॉरमॅटमध्ये कठीण असते. बरं नुसते हरवणे वेगळे आणि पार कचरा करणे यातही फरक असतो. भारतीय महिला क्रिकेट संघाने परवा इंग्लंडचा असा चोळामोळा करून मालिकेत विजय मिळवला. या विजयाची शिल्पकार होती कर्णधार हरमनप्रीत कौर. तिने कँटरबरीच्या एकदिवसीय सामन्यात जी खेळी केली ती एक सार्वकालीन उत्तम क्रिकेटची इनिंग होती. इंग्लंडमध्ये राणीची सत्ता संपली, पण इंग्लंडच्या मैदानावर महिला क्रिकेटमधल्या नव्या राणीचा राज्याभिषेक इंग्लंडने पाहिला.
हरमनप्रीत कौरने अशी स्फोटक खेळी करायची ही पहिली वेळ नव्हती. याआधी तिने इंग्लंडच्याच मैदानावर 2017 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियन संघाची धुलाई करत 115 चेंडूंत नाबाद 171 धावा केल्या होत्या. बुधवारी तिने इंग्लंडचा समाचार घेतला. हरमनप्रीत कौर मैदानात फलंदाजीला उतरली ती यास्तिका भाटिया बाद झाल्यावर.
हरमनप्रीत आणि स्मृती मानधना मोठी भागीदारी उभारणार असे वाटत असतानाच स्मृती बाद झाली आणि भारताची अवस्था विसाव्या षटकात 3 बाद 99 झाली. इथून भारतीय संघ फार फार तर सव्वादोनशे-अडीचशेचा टप्पा गाठेल अशी चिन्हे दिसत होती, पण हरमनप्रीतच्या मनात वेगळेच होते. कटस्, पूल, स्वीपचा मुक्त वापर करत तिने इंग्लिश गोलंदाजीची लक्तरे काढली. तिला साथ द्यायला होती ती फक्त सहावा सामना खेळणारी हरलीन देओल. एक कर्णधार नवोदित खेळाडूला जोडीला घेऊन कशी डावाची उभारणी करू शकते याचेही भागीदारी एक उत्तम उदाहरण होते.
हरलीन देओल सुरुवातीला चाचपडत होती. पहिल्या 18 धावा काढायला तिने 36 चेंडू घेतले, पण समोर हरमनप्रीत कौर क्रीझचा उत्तम वापर करत ज्या पद्धतीने फटकेबाजी करत होती ते बघता हरलीनने आपले गोलंदाज हेरत दोन्ही बाजूने इंग्लंड गोलंदाजीवर आक्रमण केले. हरमनप्रीतचे पहिले पन्नास व्हायला 64 चेंडू घेतले तर पुढे अवघ्या 36 चेंडूंत केले. जेव्हा हरलीन देओल बाद झाली तेव्हा भारताची धावसंख्या चाळीसाव्या षटकात फक्त 212 होती. यापुढे उत्तम धावसंख्या गाठायची शक्यता होती ती फक्त हरमनप्रीतच्या भरवशावर.
अष्टपैलू पूजा वस्त्राकरच्या जोडीने अजून 50 धावा जोडत कर्णधार हरमनप्रीतने ती 262 पर्यंत खेचली, पण ही नक्कीच विजयी धावसंख्या नव्हती. डावातली शेवटची चार षटके बाकी होती तेव्हा हरमनप्रीतने हल्लाबोल केला. चार षटकांत तिने दीप्ती शर्माबरोबर तब्बल 71 धावा लुटल्या. त्यात हरमनप्रीतने 15 चेंडूंत 49 धावा काढल्या. इंग्लंड मानसिकद़ृष्ट्या सामना इथेच हरला होता. पुढे उरली होती ती औपचारिकता. एकीकडे भारतीय पुरुष गोलंदाजीच्या मर्यादा श्रीलंका, पाकिस्तान, ऑस्ट्रेलियासारखे देश स्पष्ट करत असताना महिला क्रिकेटमधील हरमनप्रीत कौर नावाच्या राणीचा पराक्रम नक्कीच सुखावणारा होता.
निमिष पाटगावकर