पनवेल ; पुढारी वृत्तसेवा : सहाय्यक पोलीस निरीक्षक आश्विनी बिंद्रे यांची हत्या झाली त्या दिवशी मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्या घरी त्याचा साथीदार आरोपी राजू पाटील हा होता, असा खुलासा आज, गुरुवारी व्होडाफोनचे नोडल ऑफिसर चांगदेव गोडसे यांच्या घेण्यात आलेल्या उलटतपासणी दरम्यान झाला. आरोपी कुरुंदकर आणि पाटील तब्बल 12 मिनिटे एकत्र असल्याचे तपासणीत समोर आले आहे.
आश्विनी बिंद्रे प्रकरणाची गुरुवारी न्यायमूर्ती माधुरी आनंद यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी आरोपी पाटील वापरत असलेल्या मोबाईल जीपीआरएसची माहिती व्होडाफोनचे नोडल ऑफिसर गोडसे यांनी न्यायालयात दिली. त्यांच्या माहितीनुसार बिंद्रे यांची हत्या झाली, त्या दिवशी रात्री 12 वाजून 16 मिनिटांपासून 12 वाजून 28 मिनिटांपासून पर्यंत म्हणजे 12 मिनिटे आरोपी पाटील हा गोल्डन नेस्ट, भाईदर येथील कुरुंदकरच्या घरी होते.
मात्र, आरोपी पाटील याच्या वकिलाने हा मोबाईल आपल्या आशिलाचा नव्हता, असे न्यायालयात सांगितले. मात्र, विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी या युक्तीवादाला जोरदार आक्षेप घेतला. हा आक्षेप न्यायालयाने मान्य केला. कुरुंदकरचे वकील भानुशाली यांनी उलटतपासणीच्या वेळी मागील वेळी रेकॉर्डवर ठेवलेल्या पेपरवर प्रश्न विचारले. त्याला विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जोरदार आक्षेप नोंदवत, जर एखादा पेपर न्यायालयात रेकॉडर्वर आला आणि तो सिद्ध झाला, तर त्याची उलटतपासणी करता येत नाही, असे सांगितले.
त्यावर न्यायमूर्ती आनंद यांनी आपण यापुढे सर्व कागदपत्रांची तपासणी आणि उलटतपासणी झाल्यावरच रेकॉर्डवरती आणू या का, असा प्रतिप्रश्न केला. त्यानंतर ते प्रश्न मागे घेतले. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी 19 नोव्हेंबरला होणार आहे.