आगामी आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली. या संघ निवडीवेळी चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने श्रेयस अय्यर, ईशान किशन, मोहम्मद शमी, शिखर धवन, कुलदीप यादव आणि संजू सॅमसन यांच्यावर अन्याय केल्याची भावना क्रिकेट रसिकांमध्ये आहे. हे युवा खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करीत आहेत. तरीही वरिष्ठ खेळाडू संघात आले की त्यांना संघाबाहेर व्हावे लागते. भारताची बेंच स्ट्रेंथ वाढत असली तरी मुख्य संघात स्थान टिकवायचे असेल तर आणखी किती चांगली कामगिरी करायची असा प्रश्न या युवा खेळाडूंना पडला आहे.
श्रेयस अय्यर : ईशान किशनप्रमाणे श्रेयस अय्यरने देखील दमदार कामगिरी केली आहे. त्याने 2022 मध्ये आतापर्यंत 14 सामने खेळले असून 44.90 च्या सरासरीने 449 धावा केल्या आहेत. त्याचे स्ट्राईक रेट 142.99 इतके राहिले आहे. जर संघ निवड कामगिरीच्या आधारावर झाली असेल तर ईशान किशन आणि श्रेयस अय्यर संघात असायला हवे होते.
संजू सॅमसन : संजू सॅमसनने भारतीय संघात संधी मिळेल त्या वेळी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. मात्र आशिया कपसाठी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्याने विंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेत चांगली कामगिरी केली होती. मात्र आशिया कपसाठीच्या संघात वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन झाल्याने त्याला संधी मिळाली नाही.
ईशान किशन : भारतीय संघातील युवा विकेटकिपर बॅटस्मन ईशान किशनला भारतीय संघातून वगळण्यात येणे आश्चर्यकारक आहे. ईशान किशनने यंदाच्या वर्षी 14 सामन्यांत 30.71 च्या सरासरीने 130.30 च्या दमदार स्ट्राईक रेटने 430 धावा केल्या आहेत. त्याने 3 अर्धशतके देखील ठोकली आहेत. तो भारताकडून 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांमध्ये दुसर्या स्थानावर आहे.
कुलदीप यादव : कुलदीप यादवने नुकतेच भारतीय संघात पुनरागमन केले होते. त्याला वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-20 मालिकेत संघात स्थान देण्यात आले होते; मात्र त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. अखेर त्याला पाचव्या टी-20 सामन्यात खेळवण्यात आले. कुलदीपने 3 विकेट घेत आपला फॉर्म दाखवून दिला. तरी देखील त्याला आशिया कपसाठीच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही.
शिखर धवन : रोहित शर्मा, केएल राहुलच्या अनुपस्थितीत शिखर धवनने भारतीय संघाचे नेतृत्व केले. त्याने आयपीएलच्या 15 व्या हंगामात 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्यानंतर भारतीय संघात पुनरागमन करत त्याने चांगली कामगिरी केली. मात्र त्याला आशिया कप साठी संधी मिळाली नाही.