आर्यन खान प्रकरणात अमली पदार्थांचा व्यापार हा मुद्दा बाजूला पडून आर्यनचा कोठडीतला मुक्काम, नवाब मलिक आणि वानखेडे यांच्यातला वाद, वानखेडे यांचे व्यक्तिगत आयुष्य या गोष्टी केंद्रस्थानी येणे यातून काय साध्य होणार आहे?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे. आर्यन खान या स्टारपुत्राच्या अटकेमुळे तिळपापड झालेले राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे मुंबईतले प्रमुख समीर वानखेडे यांना धारेवर धरत आरोपीच्या पिंजर्यात उभे केले आहे. समीर वानखेडे मुस्लिम आहेत, इथंपासून ते त्यांच्या मेहुणीवर ड्रगविरोधी कायद्याखाली केस सुरू असल्यापर्यंत नवनवीन गौप्यस्फोट नवाबभाई रोज करीत आहेत. वृत्तवाहिन्यांनी तर नवाब मलिक आणि संजय राऊत या नावाची बीट्स तयार करून आपले कॅमेरामन आणि रिपोर्टर्स तैनात केले आहेत. आर्यन खान आणि त्या क्रूझवरील पार्टी या संदर्भातील बातम्या एखाद्या रहस्यकथेसारख्या रोज नवीन उकल करणार्या असून, सर्वसामान्य जनतेचे त्यातून फुकट मनोरंजन होत आहे.
ड्रग्ज प्रकरणावरून सध्या संशयकल्लोळाचे प्रयोग सुरू असताना भाजप आणि नवाब मलिक यांच्यात सामना सुरू झाला आहे. रोज सकाळी कुणाच्या ना कुणाच्या चारित्र्याचे धिंडवडे निघत आहेत. अगदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नीवर आरोपांची राळ उडवली गेली. दिवाळीनंतर आपणही मोठा बाँब फोडणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केल्याने त्याची वाट चॅनेलवाले पाहत असतील.
या सगळ्या भानगडीत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मात्र पूर्ण बाजूला पडल्याचे दिसते. गेल्या वर्षभरात नैसगिक आपत्तीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकर्यांना सरकारने जाहीर केलेली नुकसानभरपाई, पीक विम्याची रक्कम मिळाली की नाही, याकडे कुणाचेच लक्ष नाही. जिथे सेलिब्रिटी तिथे कॅमेरे घेऊन जाणार्या वृत्तवाहिन्यांना गोरगरीब आणि सर्वसामान्य जनता हे सेलिब्रिटी कधी वाटतील कोण जाणे!
नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यात खडाजंगी सुरू होताच रोज नवीन मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड करणारे किरीट सोमय्या बाजूला पडले. कॅमेर्यासमोरून बाजूला झाले तरी त्यांनी आपल्या कारवाया सुुरू ठेवल्या आहेत. नवाब मलिक यांनी खरे तर सोमय्या यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वागायला हवे. आपल्याकडे असलेले पुरावे थेट संबंधित तपास यंत्रणांकडे देण्यासाठी सोमय्या थेट दिल्लीपर्यंत गेले.
मलिक यांनीही आता केवळ कॅमेेर्यापुढे बोलत न राहता यंत्रणांकडे पुरावे द्यावेत, कोर्टात जावे, पोलिसांत तक्रारी कराव्यात, तरच त्यांच्या आरोपांमधील गांभीर्य लोकांच्या ध्यानात येईल; अन्यथा ते केवळ प्रसिद्धीसाठीच हे सारे करत असल्याचा आरोप त्यांच्यावर होईल. मलिक यांनी सुरू केलेली लढाई यंत्रणांमधील कचरा साफ करण्यासाठीच आहे, यावर लोकांचा विश्वास बसेल.
नवाब मलिक यांनी आपली तोफ धडाडती ठेवली असताना त्यांच्या पक्षाचा एकही नेता बोलत नाही. राष्ट्रवादीच नव्हे, तर शिवसेना आणि काँगेेसचे नेतेही मूग गिळून गप्प बसले आहेत. यामागचे रहस्य काय असावे? किरीट सोमय्यांची नजर आपल्यावर पडेल याची भीती तर नसावी? की अन्य काही कारण असावे?
एरवी राज्यातल्या अनेक प्रश्नांवर अगदी पिंपरी-चिंचवड किंवा सोलापूर महापालिका निवडणुकांवरही मोकळेपणाने बोलणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नवाब मलिक यांनी सुरू केलेल्या आरोपसत्रावर का बोलत नाहीत? असा प्रश्न पत्रकारांनाही पडत नाही. पवार यांना कुणीही यावर प्रश्न विचारल्याचे ऐकिवात तरी नाही.
या सर्व आरोप-प्रत्यारोपांमुळे केंद्रीय आणि राज्यातील तपास यंत्रणा, त्यातील अधिकारी संशयाच्या छायेत आले आहेत. चित्रपटक्षेत्र-गुन्हेगारी जग, राजकीय क्षेत्र आणि या तपास यंत्रणा यांच्याबद्दलच संशय निर्माण व्हावा असे वातावरण आज दिसते. शाहरूख खानचा मुलगा आर्यन हा नशेखोरी आणि त्यातून येणार्या गुन्हेगारी जगाच्या हिमनगाचे एक टोक आहे असे मानले, तर या मुंबईच्या मायाजालात आणखी काय काय घाण तरंगत असेल याची कल्पनाच करवत नाही. रोज चित्तचक्षुचमत्कारिक गोष्टी पुढे येत आहेत. जात, धर्म आणि असंबद्ध प्रकरणांची राळ उडवून मूळ प्रकरणावरचे लक्षच विचलित करण्याचा एखादा कट रचला गेला असावा काय? असा प्रश्न पडू शकतो.
आजवर अनेकदा तपास करणार्या यंत्रणा भ्रष्टाचार आणि पक्षपाताच्या संशयाखाली आल्या आहेत. मुंबईच्या समुद्रात क्रूझवर झालेल्या पार्टीत ड्रगचा वापर झाला की नाही, यापेक्षा तपास अधिकार्याचा धर्म आणि जात यावर चर्चा होते याबद्दल खंत बाळगावी की, अमली पदार्थांच्या व्यसनाने तरुण पिढीला विळखा घातल्याची चिंता करावी? ड्रग्जचा व्यापार रोखण्यासाठी आणि तरुणांना व्यसनांतून वाचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करायला हवेत!
दुर्दैवाने तसे न होता तपास यंत्रणांच्या कारवाया आणि संशयित गुन्हेगारांना होणारी अटक यांचा राजकीय कुरघोड्यांसाठी वापर होत आहे. प्रत्येक गोष्टीचा उपयोग राजकीय विरोधकांवर मात करण्यासाठी कसा करता येईल, याची गणिते मांडण्यात नेते रात्रंदिवस मग्न आहेत.
वास्तविक आर्यन खान प्रकरण बॉलिवूडसह उच्चभ्रू तरुणाईला पडलेला अमली पदार्थांचा विळखा, सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू, मुंबई पोलिस दलातील लाजिरवाणी गुन्हेगारी प्रवृत्ती, त्यातून सुरू झालेली खंडणीखोरी या सार्यांशी संबंधित आहे. मात्र, आता अमली पदार्थांचा व्यापार हा मुद्दा बाजूला पडून आर्यनचा कोठडीतला मुक्काम, नवाब मलिक आणि वानखेडे यांच्यातला वाद, वानखेडे यांचे व्यक्तिगत आयुष्य याच गोष्टी केंद्रस्थानी आल्या आहेत.
याखेरीज केंद्रीय यंत्रणांचे अधिकारी आणि राज्यातल्या तपास यंत्रणा यांच्यातील संघर्षाचे चित्र वारंवार दिसू लागले आहे. सीबीआय असो वा मुंबई पोलिस, प्राप्तिकर खाते असो वा ईडी आणि अन्य यंत्रणा यांनी हातात हात घालून काम करायला हवे; पण त्या सध्या एकमेकांच्या पायात पाय घालून काम करीत असल्याचे दिसते. त्यातून मुंबई महानगराचा पोलिसप्रमुख असलेला अधिकारी फरार म्हणून घोषित करण्याची नामुष्की त्याच पोलिस खात्यावर ओढवते. या सर्वांचा विचार ज्या दिवशी आपले नेते आणि जनता करेल तो सुदिन म्हणावा लागेल!