आर्थिक नियोजनाची पहिली पायरी म्हणजेच ‘आपत्ती व्यवस्थापन’

आर्थिक नियोजनाची पहिली पायरी म्हणजेच ‘आपत्ती व्यवस्थापन’
Published on
Updated on

2020-21 हे वर्ष सर्व जगाचीच प्रचंड मोठी सत्त्वपरीक्षा पाहणारे ठरले. कोरोनासारखा भीषण संसर्गजन्य रोग आला अन् संपूर्ण जगात हाहाकार माजला. कित्येक उद्योगधंदे बंद पडले. लॉकडाऊनमुळे कुटुंबामध्ये दरमहा येणारा उत्पन्नाचा स्रोत थांबला; पण खर्च थांबला नाही. महिलेने पै पै करून बचत केली होती, त्या महिलेने कुटुंबाला जगण्यासाठी मोठा आधार दिलेला दिसला.

कोरोनासारखी आपत्ती भविष्यात केव्हाही येऊ शकते. अशा प्रसंगांमध्येच जीवनाच्या नश्वरतेची प्रचिती येते. यावर मात करण्यासाठी उपयोगी येते ते आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन आणि ते सर्वांनी करायलाच हवे.

आपत्ती व्यवस्थापन ही कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाची पहिली पायरी आहे. तुम्ही जेव्हा आर्थिक नियोजन कराल तेव्हा कुटुंबातील पती- पत्नीने सर्वप्रथम आपत्ती व्यवस्थापन रोखता निधी निर्माण करायला प्राधान्य दिले पाहिजे. आपल्या कुटुंबाला सहा ते नऊ महिने पुरेल इतका पैसा नेहमी आपल्याजवळ शिल्लक ठेवला पाहिजे.

आपत्ती व्यवस्थापनील काही मुद्दे

आर्थिक नियोजनाची पहिली पायरी म्हणजेच आपत्ती व्यवस्थापनाला महत्त्व दिले पाहिजे.

आपल्या कुटुंबामध्ये दरमहा येणार्‍या उत्पन्नातून आपल्याकडे नेहमीच सहा ते नऊ महिन्यांचा खर्च चालेल इतकी रक्कम सदैव शिल्लक ठेवली पाहिजे. उदा. आर्थिक मंदी, नोकरीत बदल, अनपेक्षित अपघात, कोव्हिडसारखा संसंर्गजन्य रोग, आजारपण अशा कोणत्याही कारणांमुळे उत्पन्न थांबू शकते. त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.

सर्वप्रथम आपल्या कुटुंबामध्ये दरमहा होणारा दैनंदिन खर्च विमा हप्ते, कर्जाचे हप्ते, मासिक बजेट याशिवाय किमान सहा ते नऊ महिने पुरेल एवढा फंड प्रथम आपत्ती व्यवस्थापन म्हणून बाजूला काढून ठेवा.

तुमचे उत्पन्न 50 हजार असेल, तर तुमच्याकडे आपत्ती व्यवस्थापनासाठी किमान तीन लाख ते 4,50,000 इतकी रक्कम सदैव शिल्लक ठेवल्यास 4 टक्के ते 7 टक्के परतावा मिळू शकेल आणि कधीही रक्कम काढता येईल.

आपत्कालीन निधी कसा उभा कराल?

आज प्रत्येक कुटुंबांमध्ये एकापेक्षा अधिक बँक खाती असतात. कुटुंबातील प्रत्येकाने आपल्या महिन्याच्या उत्पन्नातून खर्चात कपात करत दर महिन्याला थोडी थोडी रक्कम आपत्कालीन निधी (इमर्जन्सी फंड) म्हणून बँकेमध्ये जमा करणे आवश्यक आहे.

याशिवाय एकरकमी मिळालेले उत्पन्न जसे की, lncentive किंवा बोनस किंवा बक्षीस किंवा जुन्या वस्तू विकून आलेली काही रक्कम ही आपत्कालीन (इमर्जन्सी फंड) निधीकडे वळवणे गरजेचे आहे. इमर्जन्सी फंड हा वेगळ्या बँक खात्यात जमा करावा. हे खाते आपल्या नेहमीच्या खात्यापेक्षा वेगळे असणे गरजेचे आहे. इमर्जन्सी फंड म्हणून ठेवलेले पैसे आपल्या एटीएमद्वारे किंवा Online बँकिंगद्वारे गरजेच्या वेळेस त्वरित उपलब्ध व्हायला हवेत.

काही लिक्विड फंडांमध्येही आपण गुंतवणूक करू शकतो. ज्यामध्ये आपण रक्कम काढण्याचे आदेश दिल्यानंतर दुसर्‍या दिवसामध्ये पैसे आपल्या बँक खात्यात जमा होतात. काही लिक्विड फंड हे 50 हजारपर्यर्ंतची रक्कम अर्ध्या तासात खातेदाराच्या खात्यावर जमा करतात. आज लिक्विड फंडांना नव्या युगाचे बचत खाते असेही म्हणतात. अशा प्रकारे आपण आपल्या कुटुंबासाठी इमर्जन्सी फंड जमा करून भविष्यात येणार्‍या अनिश्चिततेवर मात करून आपले आर्थिक आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून स्वत:ला व कुटुंबाला वाचवू शकता.

अनिल पाटील

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news