आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ

आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या गोंधळाची मालिका आजही दिसली. ही मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आरोग्य विभाग गट डच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एमपीएससी समन्वय समितीच्या वतीने पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर पेपर फुटल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ड संवर्गातील एकूण 3462 पदे भरण्यासाठीची लेखी रविवारी (ता. 31) सुरळीतपणे पार पडल्याचा दावा आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी केला.

औरंगाबादमध्ये पेपरच्या झेरॉक्स वाटल्याचा तर, शनिवारी रात्रीच पेपर फुटल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. भंडारा जिल्ह्यातील सुलोचनादेवी देवी पारधी विद्यालय , मोहाडी या केंद्रावर उमेदवारांनी पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आणला. दरम्यान, आरोग्य विभाग भरतीसाठी न्यास कंपनीकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याचे दिसून आले. दरम्यान, बीड येथे तीन उमेदवारांनी आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपरकरणाद्वारे परिक्षा देण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिक पोलीसांनी वेळीच या उमेदवारांना ताब्यात घेतले. याबाबत पुढील कार्यवाही पोलीसांकडून करण्यात येत असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

संपूर्ण भरतीच्या एसआयटी चौकशीची मागणी

आरोग्य विभागाच्या परीक्षेत उडालेल्या गोंधळाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी युवक क्रांती दलाने केली आहे. तसेच यापुढे ड विभागाच्या सर्व परीक्षा एमपीएससी मार्फतच घेण्यात याव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे.

काय म्हणाल्या आरोग्य संचालिका

चंद्रपूर, भंडारा, अकोला, मुंबई व ठाणे जिल्हयांमध्ये उमेदवारांनी परीक्षेचा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करून परीक्षा देण्यास नकार दिला. मात्र त्यांच्या संशयात काहीही तथ्य नाही. कारण परीक्षेच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांना नियुक्ती करण्यात आली होते. त्यामुळे काही उमेदवारांनी व्यक्त केलेल्या शंकेला काहीही आधार नाही. याबाबत कोणा उमेदवारांना आपले म्हणणे मांडावे, त्याबाबतची सत्यता तपासून पाहिली जाईल. वरील केंद्रांवर उमेदवारानां सर्व परिस्थिती समजावून सांगितल्यानंतर त्यापैकी मोहाडी, जि. भंडारा वगळता इतर केंद्रातील सर्व उमेदवारांनी परिक्षा दिली आणि परीक्षा प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली, असे आरोग्य संचालकांनी स्पष्ट केले.

* सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ड संवर्गातील 3462 पदासाठी राज्यातील 1364 केंद्रांवर रविवारी परीक्षा पार पडली.

* या परीक्षेसाठी 4 लाख 61 हजार 497 उमेदवारांनी अर्ज केले होते, तर त्यातील 4 लाख 12 हजार 200 उमेदवारांनी प्रवेशपत्र प्राप्त करून घेतले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news