आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या शाळांत घट

आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या शाळांत घट
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) गरीब विद्यार्थ्यांच्या 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी यंदा शाळांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्यावर्षीपेक्षा 3 हजार 627 जागांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यंदा राज्यातील 8 हजार 402 शाळांमधील 93 हजार 56 जागा आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. गेल्यावर्षी नोंदणी केलेल्या शाळांची संख्या 9 हजार 432 इतकी होती. आरटीई रक्कम प्रतिपूर्तीकडे राज्यशासनाने दुर्लक्ष केल्यानंतर शाळांनीच नोंदणी न केल्याचे दिसून येत आहे.

आरटीई कायद्यांतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणार्‍या 25 टक्के जागांवर मुलांचे मोफत प्रवेश होतात. उपलब्ध असणार्‍या संख्येच्या 25 टक्के राखीव जागांवर मुलांचे प्रवेश होतात. आरटीई अंतर्गत प्रवेश झालेल्या मुलांचे शुल्क राज्य सरकार शुल्क प्रतिपूर्ती योजनेंतर्गत भरते. त्या अंतर्गत शालेय शिक्षण विभागाला खासगी शाळांना प्रत्येक मुलाचे शुल्क द्यावे लागते.

मात्र, खासगी शाळांना हे शुल्क वेळेत मिळत नसल्याने, कोट्यवधी रुपयांची थकबाकी झाली आहे. त्यातच कोरोना महामारीमुळे राज्य सरकार आर्थिक अडचणीत आहे. अशा परिस्थितीत शालेय शिक्षण विभागाने आरटीईतून प्रवेश घेणार्‍या मुलांच्या शुल्काच्या रकमेत निम्म्याने घट केली. राज्यात आरटीई अंतर्गत दर वर्षी सरासरी 80 हजार विद्यार्थी प्रवेश घेतात.

दोन वर्षांपूर्वी प्रतिविद्यार्थी 17 हजार 600 एवढे शुल्क याप्रमाणे शुल्काची प्रतिपूर्ती शिक्षण विभागाला शाळेला करावी लागत होती. त्यानंतर आरटीईवरील खर्च कमी करायचा म्हणून ही रक्कम प्रतिविद्यार्थी आठ हजार रुपये करण्यात आली. यामुळे संस्थाचालकांनी आंदोलन केली. मात्र याचा फटका नोंदणीवर झाला असल्याचे दिसून येत आहे. काही शाळांनी नोंदणीच न केल्याने जागा कमी झाल्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी खासगी प्राथमिक शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मुंबई विभागात या कोट्यांतर्गत 343 शाळांनी नोंदणी केली असून प्रवेशासाठी 6 हजार 469 जागा उपलब्ध आहेत. गेल्यावर्षी मुंबई विभागातून 352 शाळांनी नोंदणी केली होती. शाळांची संख्या कमी झाली असली तरी प्रवेशासाठी उपलब्ध जागांमध्ये फारसा फरक पडलेला नाही. यंदा मुंबई विभागातील 6 हजार 469 जागांवर प्रवेश होणार आहेत.

गेल्यावर्षी उपलब्ध जागांची संख्या 6463 इतकी होती. आरटी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थी या वेबसाईटवर जाऊन प्रवेशअर्ज भरू शकतात. अर्जासोबत कोणतीही कागदपत्रे जोडण्याची गरज नसून पालकांच्या मार्गदर्शनासाठी मुंबई विभागात एकूण 53 मार्गदर्शन केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारेही प्रवेशअर्ज भरता येणार आहे. त्याविषयी माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news