नवी दिल्ली : वृत्तसंस्था : स्टार फलंदाज जेमिमाह रॉड्रिग्जला 4 मार्च ते 3 एप्रिलदरम्यान न्यूझीलंडमध्ये होणार्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या 15 सदस्यीय महिला क्रिकेट संघात स्थान देण्यात आलेले नाही. मिताली राज संघाची कर्णधार असेल तर, हरमनप्रीत कौर उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल. संघात स्मृती मानधना, झुलन गोस्वामी आणि युवा शेफाली वर्माला स्थान देण्यात आले आहे.
जेमिमाह आणि अष्टपैलू शिखा पांडे यांना खराब फॉर्मचा फटका बसला आहे. जेमिमाहला गेल्या वर्षी एकही आंतरराष्ट्रीय सामन्यात दुहेरी आकडा गाठता आला नाही; पण तिने इंग्लंडच्या द हंड्रेड आणि ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये चांगली कामगिरी केली होती.
दोघींनाही एकदिवसीय प्रकारातील खराब फॉर्ममुळे बाहेर करण्यात आल्याचे बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले. ऋचा घोष आणि तानिया भाटिया यांच्या रुपात भारताने दोन यष्टिरक्षकांना संधी दिली आहे. हाच भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध 9 ते 24 फेब्रुवारीदरम्यान होणार्या निर्धारित षटकांची मालिका खेळणार आहे. ज्यामध्ये एक टी-20 आणि पाच एकदिवसीय सामने खेळले जातील.
भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत 6 मार्चला तौरंगामध्ये पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळेल. यानंतर 10 मार्चला हॅमिल्टनमध्ये न्यूझीलंड विरुद्ध, यानंतर वेस्ट इंडिज (12 मार्च, हॅमिल्टन), गतविजेता इंग्लंड (16 मार्च, तौरंगा), ऑस्ट्रेलिया (19 मार्च, ऑकलंड), बांगला देश (22 मार्च, हॅमिल्टन) आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (27 मार्च, ख्राईस्तचर्च) सामने खेळतील.
आयसीसी महिला विश्वचषक 2022 व न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी संघ पुढीलप्रमाणे : मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, स्नेह राणा, झूलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह ठाकूर, तानिया भाटिया, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव. राखीव : एस. मेघना, एकता बिष्ट, सिमरन दिल बहादूर
न्यूझीलंड विरुद्ध टी-20 साठी : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, ऋचा घोष,
स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह ठाकूर, तानिया भाटिया, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, एस. मेघना, एकता बिष्ट, सिमरन दिल बहादूर.