आयटीआय, पॉलिटेक्निक साठी यंदा अर्ज वाढले आहेत. यंदाही कोरोनाची परिस्थिती असली, तरीही आयटीआय, पॉलिटेक्निकसाठी अर्ज वाढले आहेत. यावर्षी दहावीचा निकाल जास्त लागला असून विद्यार्थ्यांचा या शाखांकडील प्रवेशाकडे ओढा वाढल्याचे चित्र दिसत आहे.
कोरोना संसर्गामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर झाला. यावर्षी निकालात वाढ झाली आहे. निकालाअगोदरच आयटीआय, पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. जिल्ह्यात शासकीय, शासकीय अनुदानित, खासगी असे मिळून 20 पॉलिटेक्निक कॉलेज आहेत.
यामध्ये 6 हजार 100 हून अधिक प्रवेश क्षमता आहे. आतापर्यंत 5 हजार 500 प्रवेश अर्ज कन्फर्म झाले आहेत. गतवर्षी प्रवेशाच्या 30 टक्के जागा शिल्लक राहिल्या होत्या. ऑनलाईन प्रवेशाला चारवेळा मुदतवाढ देण्यात आली असून पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी प्रवेश अर्ज वाढण्याची शक्यता असल्याचे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया समन्वयक प्रा. महादेव कागवाडे यांनी सांगितले.
हमखास रोजगार मिळत असल्याने आयटीआयमध्ये विद्यार्थी प्रवेश घेतात. आयटीआयच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 16 जुलैपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात शासकीय 12 व 39 खासगी आयटीआय असून प्रवेश क्षमता 6 हजार 300 आहे. 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्जाची मुदत असून आजअखेर सुमारे 11 हजार अर्ज आले आहेत. इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, डिझेल मेकॅनिक आदी ट्रेडना विद्यार्थ्यांची पसंती आहे. महिलांसाठीच्या कोर्सेसला मोठा प्रतिसाद असल्याची माहिती शासकीय आयटीआयचे प्राचार्य रवींद्र मुंडासे यांनी दिली.
शासकीय तंत्रनिकेतमध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेटलर्जी आदी ट्रेडसाठी 700 जागा आहेत. आतापर्यंत 1 हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. कळंबा शासकीय आयटीआयमध्ये 31 ट्रेडसाठी 1432 जागा आहेत. आजअखेर सुमारे 2200 हून अधिक अर्ज आले आहे. त्यामुळे पॉलिटेक्निक व आयटीआय प्रवेशासाठी यंदा चुरस असणार आहे.
अकरावी प्रवेश; दुसर्या दिवशी ऑनलाईन 2,686 अर्ज
शहरस्तरीय अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. गुरुवारी दुसर्या दिवशी विविध शाखांसाठी सुमारे 2,686 ऑनलाईन अर्ज आले आहेत.
अकरावी प्रवेशासाठीची सीईटी उच्च न्यायालयाने रद्द केली. त्यानंतर दहावीच्या गुणांच्या आधारे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेस कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सुरुवात झाली आहे. प्रवेशाच्या दोन फेर्या होणार आहेत. शहरात 34 कनिष्ठ महाविद्यालये असून सुमारे 14,600 अकरावीची प्रवेश क्षमता आहे. गुरुवारी विज्ञान शाखा-(1494), वाणिज्य मराठी माध्यम-(465), वाणिज्य इंग्रजी माध्यम-(461), कला मराठी माध्यम-(246), कला इंग्रजी माध्यम-(20) असे मिळून 2,686 अर्ज प्राप्त झाले आहेत. ऑनलाईन अर्जासाठी 30 ऑगस्टअखेर मुदत आहे.