कर्नाटक विधानसभा रणधुमाळी : आता भाजपला धक्के, सवदींचा राजीनामा; इतर नाराजही बाहेर पडण्याच्या मार्गावर

कर्नाटक विधानसभा रणधुमाळी : आता भाजपला धक्के, सवदींचा राजीनामा; इतर नाराजही बाहेर पडण्याच्या मार्गावर

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा :  विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार यादी जाहीर करताना भाजपने 'दे धक्का' धोरण अवलंबल्यानंतर आता भाजपला धक्के बसू लागले आहेत. माजी उपमुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी आमदारकीचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गोळीहट्टी शेखर, सोगडू शिवाण्णाा, आमदार रघुपती भट्ट हेही काँग्रेस आणि निजदकडून उमेदवारीची चाचपणी करत आहेत. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी याआधीच स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. भाजपची उमेदवारी न मिळाल्याने सुमारे 20 नेते बंडखोरीच्या तयारीत आहेत.

लिंगायत समाजाचे प्रभावी नेते आणि 2018 पर्यंत अथणी विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व राखलेल्या लक्ष्मण सवदी यांनी विधान परिषद आमदारकीचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा बुधवारी जाहीर केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सवदी गुरुवारी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. ते अथणीतूनच काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत.

सवदी यांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू असून, भाजप सरकार सत्तेवर आल्यास त्यांचे पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही त्यांना देण्यात आली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही त्यांना पक्ष न सोडण्याची विनंती केली. पत्रकारांशी बोलताना बोम्मई म्हणाले, लक्ष्मण सवदी यांनी कोणत्याही कारणाने घाईघाईने निर्णय घेऊ नये. पक्षात त्यांच्यासाठी नक्कीच चांगले भविष्य आहे. भाजप आणि लक्ष्मण सवदी यांचे अतूट नाते आहे. उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते नाराज आहेत. मी त्यांच्याशी फोनवर बोललो आणि घाईघाईने निर्णय घेऊ नका, असे सांगितले. आगामी काळात पक्ष त्यांना महत्त्वाचे स्थान देईल.

चित्रदुर्ग जिल्ह्यातील मोळकालमूर मतदारसंघातून इच्छुक असलेले सोगडू शिवण्णा हेही पक्षाबाहेर पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. विद्यमान आमदार ज्योती गणेश यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे शिवण्णा अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील.

शेट्टर दिल्लीत

मंगळवारी सायंकाळीच अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा केलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर दिल्लीला गेले आहेत. त्यांचीही समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, पक्षाच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार शेट्टर दिल्लीला गेले आहेत. त्यांच्याशी उमेदवारीबाबत चर्चा केली जाईल. इतर उमेदवारांची यादी तयार करण्यासाठी हायकमांडशी चर्चा होईल. पहिल्या यादीत भाजपने 189 मतदारसंघातल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. येत्या दोन दिवसांत उर्वरित मतदारसंघांतील उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे.
आमदार अनिल बेनके, रामदुर्गचे आमदार महादेवाप्पा यादवाड यांच्यासह इतर नाराज नेत्यांबाबत पक्षाची भूमिका काय, हे मात्र कळू शकले नाही.

मी लक्ष्मण सवदींशी मोबाईलवर चर्चा केली आहे. घाईघाईने निर्णय न घेण्याची विनंती त्यांना केली आहे.
– बसवराज बोम्मई, मुख्यमंत्री

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news