आता तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध?

आता तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध?
Published on
Updated on

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : गहू आणि साखरेच्या निर्यातीवर निर्बंध आणल्यानंतर भारतात आता तांदळाच्या निर्यातीचे दरवाजे बंद होण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. आशिया खंडात भाताच्या उत्पादनामध्ये घट होताना खतांच्या अतिरिक्त किमती आणि किडीचा प्रादुर्भाव यामुळे तांदळाच्या दराचा आलेख वाढतो आहे. यामुळे तांदूळ निर्यात देशांतर्गत महागाईला खतपाणी घालण्यास कारणीभूत ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. साहजिकच, भारतातून तांदूळ निर्यातीवर बंधने आणली, तर जगात अन्न सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो.

जगात रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यानंतर गव्हाची टंचाई मोठ्या प्रमाणात सुरू झाली. काही युरोपिय देशात ब्रेडसाठीही गहू उपलब्ध होईना आणि जागतिक बाजारात गव्हाचा दर उच्चांकी पातळीवर गेला. याच काळात भारतात महागाईने टोक गाठण्यास सुरुवात केली, डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण सुरू झाली. या पार्श्वभूमीवर महागाई आणखी भडकून जनतेत असंतोष निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने गहू निर्यातीवर निर्बंध आणले आणि साखर निर्यातीचा कोटाही 100 लाख मेट्रिक टनांवर निश्चित केला. आता तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

जगात आशिया खंडात भाताचे उत्पादन सर्वाधिक होते आणि भात खाणार्‍यांची संख्याही या खंडामध्ये मोठी आहे. तथापि, खत दर वाढीने भाताचा प्रदेश म्हणून ओळखल्या जाणार्‍या थायलंडमध्ये तांदूळ उत्पादन घसरले. थायलंड तांदळाचा जगातील मोठा निर्यातदार आहे. तेथून निर्यात कमी होणे अपेक्षित आहे. फिलिपाईन्समध्ये भात लागवड कमी आहे, तर सर्वाधिक उत्पादन नोंदविणार्‍या चीनमध्ये भात पिकाला किडीने ग्रासले आहे.

याखेरीज भारतातील भाताच्या उत्पादनाची सर्वाधिक मदार लहरी मान्सूनवर अवलंबून आहे. या सर्व देशांच्या उत्पादन आणि देशांतर्गत वापर यांचा आढावा घेतला, तर निर्यातीवर मोठा परिणाम होऊ शकतो. निर्यातीत पुढाकार घेतला, तर देशांतर्गत मागणी व किंमत वाढून महागाई नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. साहजिकच, निर्यातीवर बंधने आणण्याकडे भारताचा कल राहील. याचा मोठा फटका जागतिक अन्न सुरक्षितेला बसू शकतो, असे विश्लेषण मांडले जाते आहे.

सध्या देशात तांदळाचा साठा मुबलक आहे. त्यातून देशांतर्गत गरज भागू शकते. परंतु, निर्यातीचे दरवाजे पूर्णतः उघडले, तर मात्र देशांतर्गत मागणी व पुरवठ्याचे संतुलन महागाई आणखी भडकविण्यास कारणीभूत ठरू शकतात. विशेषतः गव्हाच्या टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक अन्न म्हणून भाताकडे वळत असल्याने त्याचा फटका सामान्यांना बसू शकतो. ही स्थिती निर्यातीवर निर्बंध आणण्यास अधिक कारणीभूत ठरू शकेल, असा चर्चेचा सूर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news