आणखी 2 आठवडे मुंबईत पाणीकपात

आणखी 2 आठवडे मुंबईत पाणीकपात
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील अनेक भागांत शुक्रवारी पाणीटंचाई जाणवली. काही भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा झाला, तर काही भागांमध्ये पाण्याचा दाब अत्यंत कमी होता. भातसा धरणावरील जलविद्युत प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या आठवड्याच्या सुरुवातीलाच मुंबई महापालिकेने 15 टक्के पाणीकपात केली. तेव्हापासून नागरिकांना पाणीसमस्येचा सामना करावा लागत आहे. त्यातच, ही पाणीकपात आणखी दोन आठवडे सुरूच राहील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केल्यामुळे मुंबईकरांचा त्रास वाढणारच आहे.

पाणीकपात कमीत कमी ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र भातसा जलविद्युत प्रकल्पातील बिघाडाची दुरुस्ती होण्यासाठी आणखी काही काळ लागेल, असे महापालिका उपायुक्त अजय राठोड यांनी सागितले. वांद्रे परिसरात दोन दिवसांपासून सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठ्याचे संतुलन साधण्यासाठी प्रशासनाने दाब कमी केला असावा; पण त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, अशी तक्रार नगरसेवक आरिफ झकेरिया यांनी केली.

पाणीकपातीमुळे त्रस्त झालेल्या बोरिवली पूर्वेकडील रहिवाशांच्या अडचणींत शुक्रवारी आणखी भर पडली. मागाठणे मेट्रो स्थानकानजीक 900 मिमी जलवाहिनीला गळती लागल्यामुळे पाण्याचा खडखडाट झाल्याचे नागरिकांनी सांगितले. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठ्यात अडचण येण्याची शक्यता असल्याचे ट्विट महापालिकेच्या आर मध्य विभागाने केले होते.

गुरुवारी आम्हाला दोन तास पाणी मिळाले. शुक्रवार सकाळपासून नळ कोरडेच आहेत, असे कुलूपवाडीतील एका रहिवाशाने सांगितले. याबाबत नगरसेवक विद्यार्थी सिंग म्हणाले, पाणीपुरवठा लवकरच पूर्ववत करण्याची ग्वाही अधिकार्‍यांनी दिली असली, तरी शुक्रवारी संध्याकाळपर्यंत तरी परिस्थिती जैसे थे होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news