आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शिवतीर्थावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शिवतीर्थावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातारा-जावलीचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पोवई नाक्यावरील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी सातारकरांनी तोबा गर्दी केली होती. याबरोबरच महारूद्र शिवमहापंचायतन महायज्ञाला अलोट गर्दी झाली होती. सकाळीच मुहूर्तावर महायज्ञास प्रारंभ झाला. आ. शिवेंद्रराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले, रुद्रनिलराजे भोसले यांनी महायज्ञस्थळी यज्ञात समिधा अर्पण केल्या. दिवसभर विविध उपक्रमांद्वारे खणखणीत शिवेंद्रराजेंचा दणदणीत वाढदिवस साजरा झाला.

आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी सुरूचि येथे श्रीमंत सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर गारेचा गणपती येथे आ. शिवेंद्रराजेंनी गणरायाला वंदन केले. शेंद्रे येथील अजिंक्यतारा कारखान्याच्या कार्यस्थळावरील भवानी मातेची विधीवत पूजा करून आरतीही केली. यावेळी दै.'पुढारी'च्या 'जिगरी' हा विशेषांक आ. शिवेंद्रराजे यांनी भवानीमातेच्या चरणी अर्पण केला. 'पुढारी'ने प्रसिद्ध केलेल्या विशेषांकाचे प्रकाशनही देवीच्या मंदिरात झाले. यावेळी 'पुढारी' परिवाराच्यावतीने आ. शिवेंद्रराजेंनी शुभेच्छा स्वीकारल्या.

त्यानंतर गांधी मैदानावर महायज्ञ सुरू झाला. या यज्ञात आ. शिवेंद्रराजेंनी सहभाग घेतला. वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांच्यासह शेकडो ब्रम्हवृंदांच्या मंत्रघोषाने अवघी सातारानगरी प्रफुल्लित होवून नवचैतन्य निर्माण झाले. आ. शिवेंद्रराजे व सौ. वेदांतिकाराजे यांच्या हस्ते महायज्ञात समिधा अर्पण करुन वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रोच्चारात महायज्ञास प्रारंभ झाला. यज्ञाच्या ठिकाणी गट-तट विसरून अनेकांनी हजेरी लावली होती. महायज्ञामुळे सकाळपासून गांधी मैदानाच्या परिसरात प्रसन्न आणि धार्मिक वातावरण बनले होते.

शिवपंचायतन महायज्ञाला येणार्‍या सातारकरांसाठी बसण्याची चोख व्यवस्था करण्यात आली होती. यज्ञाच्या ठिकाणी आतमध्ये दर्शनाकरता प्रवेश दिला जात होता. यज्ञात आहुती देण्याचा मान सर्वसामान्य सातारकरांना देण्यात आला होता. महायज्ञाला बसवण्यात आलेल्या जोडप्यांमध्ये सर्वसामान्य सातारकर मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. महायज्ञाला भाविकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी 8 ते दुपारी 2 यावेळेत झालेल्या या महायज्ञामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.

सायंकाळी शिवतीर्थावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याने तेथे कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली होती. छ. शिवरायांचे पोवाडे व भगव्या झेंड्यांमुळे वातावरण भगवे झाले होते. सायंकाळी 5 नंतर आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पुष्पवृष्टी होत असतानाच आ. शिवेंद्रराजे यांनी छ. शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य सातारकरांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे हा परिसर गर्दीने फुलून गेला होता.

आ. शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसानिमित्त यवतेश्वर येथे स्व. अभयसिंहराजे भोसले कमानीचे उद्घाटन आ. शिवेंद्रराजेंच्या हस्ते करण्यात आले. मंगळवार पेठेतील आनंदाश्रम, लक्ष्मीबाई पाटील वसतिगृह सोमवार पेठ, रिमांडहोम सदरबझार, आशा भवन कोडोली, मातोश्री वृद्धाश्रम खावली, एहसास मतिमंद शाळा वळसे, भिक्षेकरी गृह जरंडेश्वर नाका, जिल्हा रुग्णालय सातारा (रुग्ण नातेवाईक), आर्यांग्ल हॉस्पिटल (रुग्णांना), शाहू बोर्डिंग धननीची बाग, मदरसा कब्रस्थान आणि मदरसा मोळाचा ओढा, आनंद परिवार मतिमंद शाळा फुटका तलाव येथे आ. शिवेंद्रराजे यांच्यातर्फे मिष्टान्न भोजन वाटप करण्यात आले.

सायंकाळी कला व वाणिज्य कॉलेजच्या मैदानावर आ. शिवेंद्रराजे यांनी सातारकरांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी सातारा व जावली तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news