आ. नितेश राणे यांच्या जामिनावर आज फैैसला

आ. नितेश राणे यांच्या जामिनावर आज फैैसला
Published on
Updated on

सिंधुदुर्गनगरी ; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणात येथील जिल्हा न्यायालयात सादर असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी सुनावणी झाली. आ. नितेश राणे आणि संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या वकिलांनी आज न्यायालयात आपले म्हणणे मांडले. तर सरकार पक्षाच्या वतीने आपले म्हणणे मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिलांनी सुरुवात केली आहे. या अर्जावर पुन्हा बुधवारी दुपारनंतर सुनावणी सुरू होणार आहे.

दरम्यान, ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी नितेश राणे यांचे वकील बुधवारी सकाळी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, आ. नितेश राणे आणि संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांचा संतोष परब हल्लाप्रकरणातील गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.

18 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर कणकवली येथे चाकू हल्ला झाला होता. या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांचा समावेश संशयित आरोपी म्हणून करण्यात आला आहे.

यापूर्वी सहा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. नितेश राणे आणि गोट्या सावंत या दोघांना अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणात आपल्याला अटक होऊ नये यासाठी आमदार नितेश राणे तसेच गोट्या सावंत यांनी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांच्यावतीने अ‍ॅड. संग्राम देसाई आणि अ‍ॅड. राजेंद्र राव राणे हे काम पाहत आहेत. तर या प्रकरणात राज्य सरकारने विशेष सरकारी वकिलांची नियुक्‍ती केली आहे. त्यामुळे सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत आणि अ‍ॅड.भूषण साळवी हे काम पाहत आहेत. तसेच फिर्यादी संतोष परब यांच्यावतीने सातारा येथील वकील अ‍ॅड. विकास पाटील शिरगावकर हे काम पाहत आहेत.

मंगळवारी सायंकाळी 4 वाजल्यापासून या सुनावणीस सुरुवात झाली. संपूर्ण राज्याचे या सुनावणीकडे लक्ष होते. त्यामुळे सिंधुदुर्गनगरी येथील न्यायालयाच्या इमारतीबाहेर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची मोठी गर्दी होती. न्यायालयाच्या आवारातही शिवसेना आणि भाजप पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. फिर्यादी संतोष परब आणि त्यांची पत्नीही न्यायालयात सुनावणीच्यावेळी उपस्थित होती.सुरुवातीला आमदार नितेश राणे यांच्या बाजूने वकील संग्राम देसाई यांनी बाजू मांडली.

वकील देसाई यांनी बाजू मांडताना दोन दिवसांवर जिल्ह्यातील चार नगर पालिका यांच्या निवडणुका असताना त्याचबरोबर पुढील काही दिवसात जिल्हा बँकेची निवडणूक आहे असे असताना एखाद्या कार्यकर्त्यावर हल्ला करणे म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतः दगड मारून घेणे असे आहे. असे असताना आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत हे असे करणे शक्यच नाही. ही घटना लोकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी घडली आहे.

अशावेळी हल्ला करणार्‍यांनी त्या ठिकाणाहून सर्वांना ऐकू जाईल असं आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचं नाव घेतलं हे शक्य आहे का ? ज्याला हल्ला करायचा आहे तो कुणाचे नाव सांगेल का? असा सवाल करत फिर्यादीने दिलेली फिर्याद त्याचबरोबर घडलेली घटना आणि दिलेली फिर्याद यामध्ये असलेले वेळेचे अंतर याची तफावत आदी सर्व पाहता हा सर्व बनाव असल्याचे दिसून येत आहे.

तसेच या प्रकरणात या दोघांचीही नावे हेतुपुरस्सर आणली जात आहेत. ही घटना घडल्यानंतर रुग्णालयात पोलीस पोहोचण्या अगोदर तत्काळ शिवसेनेचे नेते मंडळी पोचली आणि त्यांनी परब यांची भेट घेऊन हल्ला आमदार नितेश राणे यांनी केला असल्याचे जाहीर केले. खरे म्हणजे ही सर्व माहिती पोलिसांना असणे आवश्यक आहे. मात्र, तसे झाले नाही त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण आणि हा प्रकार डाउटफुल दिसत आहे.

पोलिसांनी या प्रकरणात प्रचंड गुप्तता ठेवण्याचे काय कारण?

या प्रकरणात पोलिसांनीही पहिल्या दिवसापासून प्रचंड गुप्तता ठेवली आहे. आरोपी कोण ? त्यांचे पत्ते काय ? त्यांना कशा स्थितीमध्ये अटक केले अधिक कोणतीही माहिती पोलिसांकडून मीडियाला दिली जात नाही. याबाबत जनतेला काहीही समजू दिले जात नाही. यामागचं कारण काय एवढी पोलीस गुप्तता का पळत आहेत, असा सवालही यावेळी वकील देसाई यांनी उपस्थित करत ज्या पोलिसांनी एवढी गुप्तता पाळली त्याच पोलिसांनी त्यानंतर बर्‍याच दिवसांनी आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांना नोटीस बजावल्याचे सांगितले, तेही जिल्हा बँकेसाठी मतदान चार दिवसावर असताना यामागेही राजकीय वास दिसत आहे, असेही कोर्टासमोर ठेवले.

फिर्यादीचा उपमुख्यमंत्र्यांनी सत्कार करण्याचे गौडबंगाल काय?

एखाद्या जखमी झालेल्या व्यक्‍तीला मदत करणे त्याला भेटणे त्याच्या कुटुंबीयांना धीर देणे या गोष्टी करणे योग्य आहे. मात्र, असे न करता त्याचा जाहीर सत्कार करणे तोही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत या पाठीमागे काय गौडबंगाल आहे हेच समजत नाही. हा मुद्दाही वकील श्री देसाई यांनी न्यायालयासमोर मांडला त्याचबरोबर ही घटना अठरा तारीखला घडली यामध्ये जर या दोघांचाही हात असला असता तर ते जिल्ह्यात निवडणूक प्रचारासाठी एवढे खुलेआम फिरले नसते हे दोघेही पठारापासून 24 डिसेंबरपर्यंत प्रचारात सगळीकडे फिरत होते तर पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर 24 आणि 25 या दोन्ही दिवशी हे दोघे पोलिस स्टेशनला गेले आहेत. दोघांचे पोलिसांनी या दोघांचे म्हणणे रेकॉर्ड केले आहे.

त्यावेळी त्यांना पटन करण्यासंदर्भात पोलिसांचे काहीच म्हणणे नव्हते मात्र, विधानभवनासमोर केलेल्या आंदोलनावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव हे त्या ठिकाणाहून जाताना एका प्राण्याचा आवाज काढण्यात आला त्या आकसा पोटी तत्काळ यांना अटक करा, असा दबाव पोलिसांवर आला त्याच मुळे अटक करण्याचा प्रकार पोलिस करत आहेत यामध्ये केवळ राजकारण दिसून येत असल्याचे देसाई यांनी न्यायालयासमोर ठेवले.

ही घटना सकाळी 11 ते अकरा पाच या दरम्यान घडली आणि तीही लोकांची वर्दळ असलेल्या कणकवली ग्रामीण रुग्णालयच्या समोर त्यानंतर त्याबाबतची फिर्याद सायंकाळी चार वाजून पाच मिनिटांनी देण्यात आली यामध्ये तब्बल पाच तासांचा अंतर आहे तोपर्यंत संबंधित फिर्यादीला शिवसेनेचे नेते मंडळी मिळाली होती त्यांनी फिर्यादीमध्ये काय सांगायचं या कालावधीत निश्चित केलं होतं असा युक्तीवाद वकील राजेंद्र रावराणे यांनी केला.

आमची केंद्रात सत्ता ही धमकी आहे….

फिर्यादी संतोष परब यांच्या वकिलांनी युक्‍तिवाद करताना असे नमूद केले की, हे भांडण 2019 पासूनचे आहे. सतीश सावंत विधानसभा निवडणुकीस उभे राहिले होते.त्यावेळपासून हे भांडण आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे काही कारण नाही असे म्हणता येणार नाही. राणे यांनी पोलीस आम्हाला इथे त्रास देत असतील तर केंद्रात आमची सत्ता आहे, असे जाहीर केले आहे.म्हणजे ही पोलिसांना धमकी आहे. त्यामुळे संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला हा यांनीच केला आहे. त्यामुळे यांना जामीन मिळू नये, असा युक्‍तिवाद केला.

दहशत माजवण्यासाठी हल्ला

सरकार पक्षाच्या वतीने युक्‍तिवाद करताना विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आमचे कुणीही काहीही करू शकत नाही. आमच्या मागे खूप मोठी ताकद आहे. हे दाखविण्यासाठीच आणि दहशत निर्माण करण्यासाठी हे आरोपी असे करू शकतात.त्यामुळे यांना जामीन मंजूर करू नये, असा युक्‍तिवाद केला. सरकारी वकीलांनी काही काळ युक्तीवाद केल्यानंतर त्यांना आणखी युक्तीवाद करायचा होता, त्यामुळे सरकारी पक्षाच्या वकीलांकडून बुधवारी युक्तीवाद करण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news