लंडन; वृत्तसंस्था : विम्बल्डन स्पर्धेच्या महिला एकेरी सामन्यात अग्रमानांकित अॅश्ले बार्टी हिने बाजी मारली. चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिला 6-3, 6(4)- 7 (7), 6-3 ने पराभूत करत चषक आपल्या नावावर केला.
अॅश्ले बार्टीने पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे. इव्होनी कावलीनंतर विम्बल्डनचे जेतेपद पटकावणारी ऑस्ट्रेलियाची दुसरी महिला टेनिसपटू ठरली आहे.
41 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने महिला एकेरीत विजेतेपदाचा झेंडा रोवला आहे. यापूर्वी बार्टीने 2018 मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
पहिल्या सेटमध्ये दमदार खेळ करणार्या बार्टीला दुसर्या सेटमध्ये प्लिस्कोव्हाने चांगलाच घाम फोडला आणि टायब्रेकरमध्ये विजय मिळवला. मात्र तिसर्या सेटमध्ये बार्टीने जोरदार कमबॅक करत प्लिस्कोव्हाला पराभूत केले.
बार्टीने सातत्यपूर्ण कामगिरी करत तीन जेतेपदे पटकावली. माद्रिद खुल्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
मात्र दुखापतीमुळे तिला इटालियन खुल्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतून माघार घ्यावी लागली होती.
तसेच फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेतही दुखापतीमुळे तिला दुसर्या फेरीचा सामना अर्धवट सोडावा लागला होता.
प्लिस्कोव्हाला मात्र हिरवळीवर चांगली कामगिरी करता आली नाही. प्लिस्कोव्हाने आर्यना सबालेंकावर मात करत विम्बल्डनच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले.
दोघींमध्ये आतापर्यंत सात लढती झाल्या असून बार्टीने पाच सामन्यांत विजय मिळवला आहे.
स्पर्धेचा प्रवास माझ्यासाठी खूप चांगला झाला. कॅरोलिनाने कडवी झुंज दिली. ती उत्तम प्रतिस्पर्धी आहे. माझ्या देशासाठी पहिल्यांदा विम्बल्डन जिंकणार्या कावलीकडून मी प्रेरणा घेतली.
– अॅश्ले बार्टी, ऑस्ट्रेलिया