अवकाळी पाऊस : हिवाळ्यात प्रथमच राजापूर, म्हैसाळ बंधारे पाण्याखाली

राजापूर : येथील कृष्णा नदीवरील पाण्याखाली गेलेला बंधारा.
राजापूर : येथील कृष्णा नदीवरील पाण्याखाली गेलेला बंधारा.
Published on
Updated on

शिरोळ, कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा :  ( अवकाळी पाऊस ) दोन दिवस अवकाळी पावसाने झोडपल्याने नद्यांची पातळी वाढली असून कृष्णा नदीवरील म्हैसाळ व राजापूर हे दोन बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर पंचगंगा नदीपात्रात 3 हजार क्युसेक पाणी मिसळत असल्याने त्यामुळे शिरोळ आणि तेरवाड बंधारे रात्री पाण्याखाली जाण्याची शक्यता पाटबंधारे विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात बंधारे पाण्याखाली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने ( अवकाळी पाऊस ) धुमाकूळ घातला आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. तर ऊसतोड मजुरांच्या खोपट्यातच पावसाचे पाणी शिरल्याने त्यांचे हाल होत आहे. पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगेपेक्षा कृष्णा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने राजापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे.  या बंधार्‍यांवर सुमारे दीड फूट पाणी आहे. पाण्याला मोठा प्रवाह असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

म्हैसाळ बंधार्‍याची पाणी पातळी 25 फुटापर्यंत पोहोचली असून बंधार्‍यावरून 5 हजार 250 क्युसेक पाणी राजापूरकडे जात आहे. तर राजापूर बंधार्‍याची पाणी पातळी 17 फुटांवर पोचली असून बंधार्‍यावरून 8 हजार 500 क्युसेक पाणी कर्नाटकात वाहत आहे. सध्या कोणत्याही धरणातून पाणी विसर्ग सुरू नसताना केवळ नदी पाणलोट क्षेत्रातील पाण्यामुळे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वास्तविक राजापूर बंधार्‍यातील पूर्वेकडील पात्रात हिप्परगी डॅमचे बॅकवॉटर आहे. डॅममधून मार्चअखेर पाणी सोडले जात नाही. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्यानंतर शेती व पिण्यासाठी म्हणून पाणी सोडले जाते. त्यामुळे राजापूर बंधार्‍यात हिप्परगीच्या पाण्याची दोन फूट फूग आहे, असे अभियंता रोहित दानोळे यांनी सांगितले.

गावागावांत साथीचे आजार ( अवकाळी पाऊस )

नदी पाणलोट क्षेत्रात पडणारा अवकाळी पाऊस, नद्यांची वाढणारी पाणी पातळी यावर लक्ष ठेवून असणार्‍या सांडपाणी निर्मिती प्रकल्पधारकांनी पंचगंगा नदीपात्रात रसायन, मळीमिश्रित दूषित पाणी सोडले आहे. परिणामी पाण्याला काळा रंग येऊन दुर्गंधी पसरली आहे. पाण्याला फेस आला असून नदीकाठावर लहान मासे मृत होत आहेत. याशिवाय पंचगंगा नदीचे पाणी पिण्यास वापरणार्‍या गावांत थंडी, ताप, अंगदुखी, पोटदुखी, सर्दी असे आजार सुरू झाले आहेत.

हिप्परगीच्या बॅकवॉटरमुळे बंधार्‍यावर कृष्णा नदीची पाणी पातळी 14 फुटांवर आहे. राजापूर बंधार्‍यावर शुक्रवारी पाणी पातळी 17 फूट आहे. मात्र पाऊस कमी झाल्यास शनिवारी सायंकाळपर्यंत बंधार्‍यावरील पाणी ओसरू शकते.
– रोहित दानोळे,
राजापूर बंधारा पाटबंधारे अभियंता

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news