पुणे; पुढारी वृत्तसेवा : कॉलेजला एकत्र असताना जुळलेल्या प्रेमसंबधातून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडल्यानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली.
याच दरम्यान ती गोव्याला नातेवाईकांकडे गेली. तेथे गेली असताना तिने तेथील स्थानिक मापुसा पोलिस ठाण्यात आरोपी विरूध्द तक्रार दिल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान हा सर्व प्रकार हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने ही फिर्यादी झिरो नंबरने हडपसर पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आली आहे.
याप्रकरणी कुणाल पटेल (रा. फातीमानगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगीही सतरा वर्षाची असून तिचे आणि आरोपीचे प्रेमसंबंध जुळले होते. यासंबंधातून त्याने फेब्रुवारी 2019 मध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याच अत्याचारामुळे पिडीत मुलगी गर्भवती राहिली होती.
तिचे नातेवाईक गोव्याला असल्याने ती गोव्याला गेल्यानंतर तिला ती गर्भवती राहिल्याचे समजले. तिला वेगवेगळ्या पध्दतीने गर्भपात करण्यासंबधी सांगण्यात आले. परंतु, तिने गर्भपात करण्यास नकार देऊन ती मुलाला जन्म देऊन सांभाळण्याच्या वक्तव्यावर कायम राहिली. याच दरम्यान ती गोव्यातील एका हॉस्पीटलमध्ये दाखल झाली. त्यानंतर हॉस्पीटलमध्ये दाखल असताना तिच्यावरील अत्याचाराच्या अनुषंगाने मापुसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पिडीत मुलीने एका मुलाला जन्म दिला असून ते मुल आता एक वर्षाचे झाले आहे. मापुसा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून ही तक्रार पुढील तपासासाठी झिरोनंबरने हडपसर पोलिस ठाण्याकडे पाठविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले. पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.