बंगळूर ; पुढारी वृत्तसेवा : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचे काम लवकरच हाती घेतले जाईल, अशी माहिती पाटबंधारेमंत्री गोविंद कारजोळ यांनी मंगळवारी दिली.
विधानसभेत काँग्रेस आमदार शिवानंद पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री कारजोळ म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची सध्या 519.60 मीटर असून, ती 524.25 मीटर करण्यासाठी तातडीने काम सुरू करणार आहोत. 2011 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार कृष्णा जलतंटा लवादाने दिलेला अंतिम निर्णय राजपत्रात समाविष्ट करावा, अशी विनंती आम्ही केंद्र सरकारला केली आहे. त्यासाठी केंद्रीय जलमंत्र्यांची भेटही घेतली होती.
अलमट्टीची उंची वाढविण्याचे काम सुरू करण्याआधी कर्नाटक, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय व्हायला हवा. तसेच त्यानंतर लवादाचा निर्णय राजपत्रातून प्रकाशित व्हायला हवा.
राजपत्राच्या प्रकाशनासाठी कर्नाटकाने 2019 मध्ये मध्यंतर याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे, अशी माहितीही कारजोळ यांनी दिली. अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना पुराचा फटका बसण्याची भीती आहे.