अर्थज्ञान : मायक्रो इन्श्युरन्सच्या अंतरंगात…

अर्थज्ञान : मायक्रो इन्श्युरन्सच्या अंतरंगात…

ज्याप्रमाणे धर्म, जात, वर्ण आणि भाषा वेगवेगळ्या असतात, त्याप्रमाणे त्यांचे व्यवसायदेखील वेगळे असतात. व्यवसाय वेगळे असल्यास त्यांच्या उत्पन्नात समानता नसते. एखादा कमी उत्पन्न कमावतो, तर कोणी जास्त. याद़ृष्टीने विविध क्षेत्रांतील कंपन्यांनी प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी वेगवेगळे उत्पादन बाजारात आणले आहे. विमा कंपन्यांनीदेखील विविध वयोगटातील लोकांसाठी गरजेनुसार विमा योजना आणल्या आहेत. समाजातील कोणताही घटक विमा योजनांपासून वंचित राहू नये यासाठी विमा नियामक संस्थे (इर्डा) ने मायक्रो इन्श्युरन्स रेग्युलेशन 2005 लागू केले आणि त्यानंतर विमा कंपन्यांनी सूक्ष्म (मायक्रो) विमा योजना बाजारात आणल्या.

कमी असतो हप्ता

मायक्रो इन्श्युरन्स योजनेत अन्य जीवन विमा योजनेच्या तुलनेत हप्त्याची रक्कम कमी असते. अलीकडेच सरकारने दररोज एक रुपया हप्ता असणारी विमा योजना आणली आहे. कमी हप्ता असल्याने गरिबातील गरीब व्यक्तीदेखील याप्रकारची योजना घेऊन आर्थिक सुरक्षा मिळवू शकतो. अनेक कंपन्यांकडून अडीचशे रुपये मासिक हप्त्यावरदेखील विमा योजना दिली जात आहे.

नियम हे सामान्य पॉलिसीनुसार

मायक्रो इन्श्युरन्स पॉलिसीचे सर्व नियम सामान्य विमा पॉलिसीनुसारच असतात. सूक्ष्म विमा इन्श्युरन्स नियमानुसार सरेंडरचीदेखील तरतूद आहे. उदा. जर हप्ता देण्याचा कालावधी 5 वर्षांचा आहे, तर किमान दोन वर्षांपर्यंत संपूर्ण हप्ता भरल्यानंतर पॉलिसी सरेंडरदेखील करता येऊ शकते. ज्याप्रमाणे पॉलिसी गहाण ठेवून बँकेकडून कर्ज घेता येते, त्याप्रमाणे मायक्रो इन्श्युरन्स पॉलिसीवरदेखील कर्ज मिळते. कर्जाची रक्कम ही पॉलिसीच्या 90 टक्क्यांपर्यंत मिळते. विमाधारक पॉलिसीनंतर एक वर्षाच्या आत आत्महत्या करत असेल, तर त्याच्या वारसदाराला नियमानुसार जमा असलेल्या रकमेच्या 80 टक्क्यांपर्यंत भरपाई देते. अर्थात सर्व नियम इर्डाकडून निश्चित केले जातात. यानुसार कंपन्या ग्राहकांचे हित लक्षात घेत अधिकाधिक आकर्षक योजना आणण्याचा प्रयत्न करतात.

परिपक्वतेपोटी भरपाई

मायक्रो विमा पॉलिसीत साधारणपणे अन्य जीवन विमा पॉलिसीत देण्यात येणार्‍या बोनसच्या ठिकाणी विविध वयोगटांतील व्यक्तींसाठी वेगवेगळे वार्षिक गॅरेंटेड अ‍ॅडिशनची देण्याची तरतूद आहे. वयोगटातील वर्गीकरण हे सामान्यपणे 18 ते 35, 36 ते 40, 40 ते 45 आणि 46 ते 50 असे असते. अशी श्रेणी अन्य विमा योजनांतही असते. गॅरेंटेड अ‍ॅडिशनची गणना विमाधारकांच्या वयोमानानुसार केली जाते. विमा कालावधी पूर्ण झाल्यानंतर विमाधारकाला मॅच्युरिटीनंतर मिळणार्‍या रकमेबरोबरच गॅरेंटेड अ‍ॅडिशनदेखील दिली जाते.

मृत्यू दाव्याची भरपाई 

सामान्य आणि अन्य जीवन विमा योजनेत एक वर्षाच्या आत विमाधारक आत्महत्या करत असेल, तर त्याला कोणतीही भरपाई दिली जात नाही. पण सूक्ष्म जीवन विमा योजनेत त्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. विमाधारकाचे निधन झाले असेल आणि पॉलिसी सक्रिय असेल, तर नॉमिनीला विमा रकमेबरोबरच जितकी वर्षे विमा सुरू आहे, तेवढ्या वर्षाची गॅरेंटेड अ‍ॅडिशन प्रदान केली जाते. कोणत्याही सामान्य स्थितीत विमाधारकाच्या निधनानंतर त्याने भरलेल्या हप्त्यापोटी 105 टक्के भरपाई वारसदाराला दिली जाते.

कवचामध्ये काय?
सूक्ष्म जीवन विमा पॉलिसीच्या विमा कवचमध्ये लाईफ कव्हरबरोबर स्थायी अपंगत्वाचा समावेश करण्यात आला आहे. अर्थात हे मुख्य विमा योजनेत सामील नसते; परंतु त्यास रायडर म्हणून सामील केले आहे. सामान्यपणे सूक्ष्म विमा योजनेत रायडरची तरतूद नसते.

कंपन्यांना कोणताही लाभ नाही
बहुतांश जीवन विमा योजना या कंपन्यांच्या नावाने आणल्या जातत. मात्र या योजनांमुळे कंपन्यांना अधिक फायद्याची शक्यता राहात नाही. त्याचबरोबर या योजनेच्या हप्त्यातून विमा लक्ष्यचे टार्गेटदेखील पूर्ण होत नाही. त्यामुळे त्याचा फारसा गाजावाजा केला जात नाही.
विमा कवच कमी असते
मायक्रो इन्शूरन्स विमा पॉलिसीतून मिळणार्‍या कवची रक्कम देखील कमीच असते. यात किमान 5 हजारांपर्यंत कवच दिले जाते तर कमाल 50 हजारांपर्यंत. एखादा व्यक्ती अधिक कवच घेऊ इच्छित असेल तर हप्ता वाढवू शकतो आणि विमा कंपनीकडून अधिक जोखमीचे कवच देण्याचा आग्रह करू शकतो.

-जगदीश काळे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news