पणजी ; पुढारी वृत्तसेवा : गोव्याच्या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न दिल्यास निवडणुकीनंतर भाजप सोडून अन्य पक्षांसोबत युतीबाबत विचार करू शकतो, असे प्रतिपादन दिल्लीचे मुख्यमंत्री तथा 'आप'चेे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केले. यावेळी त्यांनी तेरा मुद्द्यांचे व्हिजन डॉक्युमेंट जाहीर केले. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबाबत आदर असून, त्यांचे पुत्र उत्पल 'आप'मध्ये आल्यास त्यांचे स्वागत असल्याचेही त्यांनी सांगितले. पणजी येथे रविवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
केजरीवाल म्हणाले की, आम्हाला गोव्यात तोडफोडीचे अथवा जोडाजोडीचे राजकारण करायचे नाही. आम्हाला राज्याचा विकास करायचा आहे. येथे भ्रष्टाचारमुक्त सरकार आणायचे आहे. लोकांना कळून चुकले आहे की, काँग्रेसला मत दिले, तर ते भाजपला जाणार. 2017 मध्ये काँग्रेसचे 17 आमदार होते. आज केवळ दोन उरले आहेत. भाजप केवळ खोटी आश्वासने देत आहे, तर काँग्रेस आता आम्हाला संधी द्या म्हणत आहे. विकासाबाबत कोणीही बोलत नाही. तृणमूल काँग्रेससोबत कोणतीही युती करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
अरविंद केजरीवाल यांनी गोव्याच्या विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट सादर केले. ते म्हणाले की, गोव्याला मुक्ती मिळून 60 वर्षे झाली, तरी राज्याच्या मूलभूत समस्या सुटलेल्या नाहीत. याला भाजप, काँग्रेस आणि मगोप जबाबदार आहेत. 'आप' सत्तेत आल्यास प्रामुख्याने 13 मुद्द्यांवर भर दिला जाईल. यामध्ये रोजगार, खाणप्रश्न, भू अधिकार, शिक्षण, आरोग्य, भ्रष्टाचारमुक्त शासन, महिलांसाठी आर्थिक मदत, शेती, उद्योग, पर्यटन, वीज, पाणी आणि रस्ते या मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जाणार आहे. याखेरीज वेळोवेळी विविध मुद्दे यामध्ये घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.
पंजाबमध्ये 'आप'चे सरकार येेईल
केजरीवाल म्हणाले, संपूर्ण देशात 'आप'बद्दल एक आशावादी द़ृष्टिकोन तयार झाला आहे. सामान्य माणसाला डोक्यावर छप्पर, पाणी, रस्ते, वीज, शिक्षण अशा मूलभूत सुविधा हव्या आहेत. देशात फक्त 'आप'च लोकांना चांगल्या दर्जाच्या मूलभूत सोयी देत आहे. आम्ही दिल्लीत हे काम करून दाखवले. यामुळे पंजाबमध्ये 'आप'चे सरकार येईल, अशी खात्री आहे.
पेट्रोलवर कर कमी करण्याचा विचार
केजरीवाल म्हणाले की , आम्ही भ्रष्टाचारमुक्तसरकार देणार आहोत. त्यामुळे साहजिकच पैशांची बचत होणार आहे. वाचलेल्या पैशातूनच आम्ही विविध सुविधा पुरविणार आहोत. पेट्रोलवरील कर कमी करून गोव्यात पेट्रोल दर कमी करण्याचा नक्की प्रयत्न करू.