अमरावती दंगल : माजी कृषिमंत्री अनिल बोंडेंसह महापौरांना अटक

अमरावती दंगल : माजी कृषिमंत्री अनिल बोंडेंसह महापौरांना अटक
Published on
Updated on

अमरावती ; पुढारी वृत्तसेवा : अमरावती दंगल प्रकरणी भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना त्यांच्या निवासस्थानातून सोमवारी अटक करण्यात आली. आमदार प्रवीण पोटे यांच्या अटकेसाठी पोलीस सोमवारी पहाटेच त्यांच्या घरी गेले होते. परंतु, ते मुंबईला गेल्याचे कळाले.

अमरावती दंगल हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 14 हजार 673 नागरिकांविरुद्ध दंगलीचे गुन्हे नोंदविले असून, 26 गुन्ह्यांत शंभरहून अधिक दंगेखोरांना अटक करण्यात आली आहे. भाजपचे महापौर चेतन गावंडे, नगरसेवक तुषार भारतीय, शिवराय कुळकर्णी, गजानन देशमुख, मंगेश खोंडे, अजय सामदेकर, निवेदता चौधरी, सुरेखा लुंगारे, राधा कुरील यांनाही अटक झाली. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत शंभरहून अधिक नागरिकांना अटक करण्यात आली. या अटकसत्रामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील संचारबंदीमुळे सर्वत्र शुकशुकाट असून, हे अटकसत्र आणखी काही दिवस चालेल.

अमरावतीच्या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दबावाखाली पोलिसांकडून डॉ. बोंडे यांच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे मागे घेण्याची मागणी भाजपने सोमवारी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली.

इंटरनेट बंदच

दंगलीनंतर अमरावती शहरात संचारबंदी लागू झाली असून, इंटरनेट सेवा बंद करण्यात आहे. सोमवारी दुपारी 2 ते दुपारी 4 पर्यंत दूध वाटपाकरिता तसेच शासकीय अथवा निमशासकीय कामकाज आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळेनुसार संचारबंदीत शिथिलता देण्यात आली.

5 लाख 15 हजारांचे नुकसान

12 नोव्हेंबर रोजी रझा अकादमी या इस्लामिक संघटनेच्या वतीने त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ राज्यव्यापी बंद पुकारला होता. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात धरणे, निदर्शने करणे व निवेदन देण्याकरिता विनापरवानगी मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चा परत जात असताना, बाजारपेठेतील व्यापारी प्रतिष्ठानांवर दगडफेक व तोडफोड करण्यात आली. यामुळे व्यापार्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. या दगडफेक व तोडफोडीत 5 लाख 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

राज्यातील दंगलींची चौकशी करणार

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : त्रिपुरात घडलेल्या कथित घटनेचे निमित्त करीत राज्यात पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान घडवण्यात आलेल्या दंगलींच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी येथे दिली.

गडचिरोली चकमकीतील जखमी जवानांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर ते बोलत होते. अमरावतीत जमावबंदी असताना भाजपने मोर्चा काढला. त्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. भाजप नेते आशिष शेलार हे रझा अकादमीच्या कार्यालयात बसून होते, असा आरोप अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाचीही चौकशी करण्याची घोषणा वळसे पाटील यांनी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news