गुडाळ ; आशिष ल. पाटील : राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईत पंचतारांकित हॉटेलवर ठेवण्यात आलेले सेनेचे बंडखोर आमदार पुन्हा सुरत आणि गुवाहाटीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये बंदिस्त झाले. सातत्याने पंचतारांकितमधील शाही भोजनाला कंटाळलेल्या आणि घरच्या जेवणाची ओढ लागलेल्या आमदारांना अनपेक्षितपणे गुवाहाटी येथील एका मराठी कुटुंबाने अस्सल मराठमोळे जेवण पोहोच केले. या जेवणातील झुणका-भाकरीवर आमदार अक्षरश: तुटून पडले. आ. प्रकाश आबिटकर यांनी हा किस्सा दै.'पुढारी' च्या प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितला.
राज्यसभा निवडणूक मतदानाच्या निमित्ताने प्रथम सेना आमदारांना मुंबईतील हॉटेल रिट्रीट या पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्रित ठेवण्यात आले होते. मतदानानंतर लगेच काही दिवसांत विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने या आमदारांना पुन्हा 17 जूनपासून वेस्टीन या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले होते. विधान परिषदेचे मतदान करून तेथूनच शिंदे गटाचे बंडखोर सेना आमदार रातोरात सुरतच्या 'मेरिडियन' या पंचतारांकित हॉटेलमध्ये दाखल झाले.
तेथे दोन दिवस मुक्काम ठोकून 23 जूनला आसाम राज्यातील गुवाहाटीच्या 'रेडिसन ब्ल्यू' या पंचतारांकित हॉटेलमध्ये आठवड्याभरासाठी बंदिस्त झाले. सातत्याने पंचतारांकित हॉटेलचा पाहुणचार घेतलेले आमदार या पंचतारांकित शाही भोजनाला कंटाळले होते. घरच्या जेवणाची प्रत्येकाला प्रकर्षाने आठवण येत होती.
गुवाहटी मुक्कामी असतानाच अचानक एक दिवस खानापूरचे आमदार अनिल बाबर यांच्याशी संबंधित तेथे एक मराठी कुटुंब होते. त्या मराठी कुटुंबाने आ. बाबर यांच्या सूचनेनुसार सर्व आमदारांसाठी ज्वारीच्या भाकरी, झुणका, खर्डा, लोणचे, भात-आमटी असे खास महाराष्ट्रीयन भोजन रेडिसिन हॉटेलमध्ये पोहोच केले. सातत्याने पंचतारांकित हॉटेलमधील शाही भोजनाला कंटाळलेले आमदार या मराठमोळ्या घरगुती जेवणावर अक्षरशः तुटून पडल्याचे आ. आबिटकर यांनी सांगितले.
खूप दिवसांनी अगदी घरच्यासारखे जेवण मिळालेल्या सर्व आमदारांनी चांदीकामाच्या निमित्ताने गुवाहाटीमध्ये स्थायिक झालेल्या या मराठी कुटुंबाचे आणि अर्थातच आ. अनिल बाबर यांचेही मनापासून आभार मानले.