सांगली : पुढारी वृत्तसेवा : अनिकेत कोथळेच्या मृतदेहाचा मरणोत्तर पंचनामा मीच केला, अशी साक्ष सावंतवाडी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एम. एस. बुद्धवंत यांनी दिली. त्यांची व सीआयडीचे ज्योती आमने यांची साक्षी पूर्ण झाली. आज बुधवारी पुन्हा सुनावणी सुरू होणार आहे.
सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम व त्यांना सहाय्यक म्हणून जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले. बचाव पक्षातर्फे अॅड. गिरीष तपकिरे, अॅड. प्रमोद सुतार, त्यांचे सहाय्यक म्हणून अॅड. अर्जुन मठपती, अॅड. विकास पाटील यांनी काम पाहिले. सीआयडीचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी व विद्यमान उपअधीक्षक आयेशा लांडगे सरकार पक्षाला मदत करत आहेत.
अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांच्या समोर सुरू आहे. एम. एस. बुधवंत यांनी साक्षी दिली की, अनिकेत कोथळे याच्या मृतदेहाचा मरणोत्तर (इन्क्वेस्ट) पंचनामा मीच केला आहे. दिनांक 9 नोव्हेंबर 2017 रोजी आंबोली घाटातील महादेवगड येथे जाऊन मी दोन पंचासमक्ष हा पंचनामा केला आहे. उज्ज्वल निकम यांनी त्यांची मुख्य साक्षी घेतली. उलट तपासा दरम्यान त्यांनी मरणोत्तर पंचनामा करण्यापूर्वी अनिकेत कोथळे यांच्या कुटुंबियांना कळविले नव्हते व 24 तासात मानवाधिकार आयोगाकडे याबाबतची माहिती कळवली नव्हती. तसेच पंचनामा करताना व्हिडीओ शूटिंग करणारे पोलिस होते. शूटिंगमधील तज्ज्ञ नव्हते अशी साक्ष दिली. त्यांची साक्ष आज पूर्ण झाली.
सीआयडीचे कर्मचारी ज्योती आमने यांची मुख्य साक्ष व उलट तपास पूर्ण झाला. 12 नोव्हेंबर 2017 रोजी रात्री मी पुण्याला गेले होते. सकाळी साडेसात वाजता पुण्यात पोहोचले होते. डीएनए तपासणीसाठी रक्त काढण्याचे किटसाठी मी शासकीय प्रयोगशाळेला गेले होते. उलट तपासा दरम्यान अनावधानाने त्यांच्याकडून काही वाक्य निघून गेल्याने व ती साक्ष बचाव पक्षाला मदतीची ठरेल असे वाटल्याने उज्ज्वल निकम यांनी त्यांना पुन्हा फेरसाक्षीसाठी बोलवले. त्यावेळी त्यांची साक्ष सुधारण्यात आली.
लूटमार केल्याच्या संशयावरून अनिकेत कोथळे व अमोल भंडारे यांच्यावर सांगली शहर पोलिसात 2017 मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्या दोन्ही संशयितांना दोन दिवसाची पोलिस कोठडी दिली होती. पोलिस कोठडीत पोलिस ठाण्यातील डीबी रूममध्ये तपासाच्या नावाखाली अमानुष मारहाण केल्याने अनिकेत कोथळे याचा तिथेच मृत्यू झाला होता. त्यानंतर अनिकेत कोथळे यांचा मृतदेह आंबोली (रत्नागिरी) येथे नेऊन जाळण्यात आला होता. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता.
तसेच अनिकेत पोलिस कोठडीतून पळून गेल्याचा बनाव करून तशी नोंद स्टेशन डायरीला घेण्यात आली होती. याप्रकरणी तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद आहे. तर संशयित अरूण टोणे न्यायालयीन कोठडीत असताना मयत झाले आहेत. या खून खटल्याची सुनावणी सुरू आहे.