अद्वितीय महाराणी

अद्वितीय महाराणी
Published on
Updated on

राणी एलिझाबेथ या आधुनिक ब्रिटनच्या इतिहासाच्या केंद्रस्थानीच राहिल्या. त्यांच्या कार्यशैलीने केवळ ब्रिटनमधीलच नव्हे तर जगभरातील लोकांना प्रभावित केले. त्यांच्या नावाला जोडूनच येणारा सर्वांत मोठा शब्द म्हणजे कर्तव्य. त्या कधीच त्यांच्या घटनात्मक मर्यादेपलीकडे गेल्या नाहीत. ब्रिटनच्या सरकारला किंवा जनतेला लाजवेल, असा कोणताही वाद त्यांनी कधीच निर्माण केला नाही.

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले. एलिझाबेथ या ब्रिटनच्या सत्तेत सर्वाधिक काळ सम्राज्ञी म्हणून राहिल्या. तब्बल सत्तर वर्षे त्यांनी राज्याचे प्रमुखपद भूषवले. एक प्रकारे त्या आधुनिक ब्रिटनच्या इतिहासाच्या केंद्रस्थानीच राहिल्या. ब्रिटन हे एकेकाळी खूप मोठे साम्राज्य होते. हळूहळू त्याचे विघटन होत गेले. साम्राज्यवाद संपून ब्रिटन हा जेव्हा एक देश झाला तेव्हा त्यात अनेक अंतर्गत बदल झाले. या सर्व बदलांमध्ये जी संस्था स्थिर राहिली, ती म्हणजे ब्रिटिश राजेशाही. एलिझाबेथ यांच्याकडे राजकीय शक्ती नव्हती; परंतु सॉफ्ट पॉवर मोठ्या प्रमाणावर होती. जग बदलत राहील, परंतु राजेशाहीची संस्था ब्रिटनच्या लोकांना स्थैर्य, गांभीर्य आणि परंपरेबद्दल आत्मीयता देईल आणि ती कोणत्याही सांस्कृतिक संदर्भात महत्त्वपूर्ण आहे, हे दाखवून देण्यात महाराणी एलिझाबेथ सक्षम होत्या.

आपल्याकडे राजकीय शक्ती नाही, कारण ब्रिटनमध्ये घटनात्मक राजेशाही असल्याने सर्व सत्ता निवडून आलेल्या सरकारकडे आहे, हे राणी एलिझाबेथ यांना चांगले ठाऊक होते. लोकशाही सरकारच्या अधिकृत धोरणांना मंजुरी देण्याची ताकद राणीकडे असते. ही ताकद त्यांनी उत्तम प्रकारे समजून घेतली. त्या कधीच त्यांच्या घटनात्मक मर्यादेपलीकडे गेल्या नाहीत. ब्रिटनच्या सरकारला किंवा जनतेला लाजवेल, असा कोणताही वाद त्यांनी कधीच निर्माण केला नाही. जी राजेशाही त्यांच्या अधिपत्याखाली राहिली, त्या माध्यमातून त्यांनी ब्रिटनला जगात प्रतिष्ठा मिळवून दिली. जे राष्ट्रकुल देश एकेकाळी ब्रिटिश साम्राज्याशी निगडित होते त्या देशांसह इतर देशांमध्येही राणीसाहेबांबद्दल जो आदर आणि भावना आज दिसून येत आहे, ती मुख्यत्वे राणी एलिझाबेथ यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वामुळे आहे. स्वतःबद्दल कमीत कमी बोलणार्‍या, तरीही आत्यंतिक अधिकारवाणी असलेले हे एक व्यक्तिमत्त्व होते. जगभरातील अनेक नेत्यांकडून त्यांच्या आठवणी ऐकल्यास एक गोष्ट लक्षात येते की, सर्व काही माहीत असूनही आपल्या घटनात्मक प्रतिष्ठेचे पालन कुठे करायचे आहे, कुठे आणि कसे वागायचे आहे, हे राणीसाहेबांना चांगलेच माहीत होते.

त्यांच्या कार्यशैलीने केवळ ब्रिटनमधीलच नव्हे तर जगभरातील लोकांना प्रभावित केले. अनेक वेळा बर्‍याच देशांमध्ये घटनात्मक संकट निर्माण झाल्याचे आपण पाहतो. लोकांना संस्थांच्या मर्यादा कळत नाहीत. पण सत्तर वर्षे राज्य केल्यानंतर ब्रिटनच्या राणीसाहेब यांच्यावर किंवा राजसत्तेवर आक्षेप घेतले गेल्याचा प्रसंग कधीही घडला नाही. अडचणी आल्या; पण त्या इतरांमुळे. मुले, सुना, नातवंडे यांच्यामुळे अडचणीचे प्रसंग आले. पुढे काय होणार, असा प्रश्नही पडला? आताही असा प्रश्न पडला आहे की, किंग चार्ल्स झालेले प्रिन्स चार्ल्स ब्रिटनला राजा म्हणून जे स्थैर्य आणि सन्मान राणीसाहेबांनी मिळवून दिला, तो मिळवून देऊ शकतील का? आणि त्यांच्या अधिपत्याखाली एक संस्था म्हणून राजेशाही टिकेल का? राणीसाहेबांनी तो सन्मान मिळवून दिला, कारण त्यांची कार्यशैलीच सन्मानास योग्य होती. ब्रिटनच्या राजकारणात अनेक बदल घडून आले. संकटे आली. काही पक्ष तर असे म्हणत होते की राजेशाहीची गरज खरोखर आहे का? युवा पिढीने तर आजच्या काळात गरजच उरलेली नसल्याने राजेशाही संपुष्टात आणली पाहिजे, असे मत मांडले. परंतु राणी एलिझाबेथ यांच्यावर लोक इतके प्रेम करीत होते की, हा सवाल अशा टप्प्यापर्यंत पोहोचलाच नाही, जिथून पुढे एक संस्था म्हणून राजेशाही संपुष्टात आणण्याच्या हालचाली सुरू होतील. आज राणी एलिझाबेथ यांच्या जाण्यानंतर राजसत्तेसमोर सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की, राजेशाहीचे भविष्य काय असेल? राणी एलिझाबेथ यांनी वेगवेगळ्या संदर्भांत किती मोठी भूमिका बजावली आहे, हे यातूनच स्पष्ट होते.

राणी एलिझाबेथ या नावाला जोडूनच येणारा सर्वांत मोठा शब्द म्हणजे कर्तव्य. अंतर्गत आणि बाह्य बदल होऊनसुद्धा त्यांनी आपले कर्तव्य बजावणे सुरूच ठेवले. त्यांच्या मृत्यूच्या अवघे 48 तास आधी त्यांनी पंतप्रधान लिझ ट्रस यांची भेट घेतली. त्या इंग्लंडच्या 15 व्या पंतप्रधान आहेत. ब्रिटनमध्ये नवे पंतप्रधान सत्तेवर आले की, ते राणीसाहेबांना भेटतात. सत्तर वर्षांत असे 15 पंतप्रधान एलिझाबेथ यांनी पाहिले. पण त्यांची स्वतःची कार्यशैली कायम राहिली. ब्रिटिश राज्यघटनेशी त्यांची बांधिलकी कायम राहिली. जेव्हा राजकुमारी डायना यांचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांना असे बोलले गेले की, त्या खूप असंवेदनशील आहेत. कारण त्यांनी बाहेर येऊन आपले दुःख प्रकट केले नाही. आपल्या राणीसाहेब आहेत तरी कुठे, हा प्रश्न त्यावेळी अनेकांनी विचारला होता. डायना यांच्याबद्दल राणीसाहेबांच्या कठोर वर्तनाची कारणे काय होती? परंतु त्यांनी आपल्या भावना सार्वजनिक ठिकाणी क्वचितच व्यक्त केल्या आणि डायना यांचा मृत्यू त्याला अपवाद नव्हता, हे लोकांना अखेर कळून चुकले. कोणत्याही भावना किंवा विचार व्यक्त केले असते, तरी त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो, हे त्यांना नेमके ठाऊक होते. त्यामुळे त्या उघडपणे फारशा बोलल्या नाहीत. त्यांचा प्रभाव केवळ घटनात्मक सम्राज्ञी म्हणूनच आहे असे नव्हे तर पिढ्यान्पिढ्या आपण ब्रिटिश व्यक्ती असल्याची भावना त्यांनी लोकांमध्ये द़ृढ केली, त्याबद्दलही आहे. एका सामान्य ब्रिटिश नागरिकाला आपल्या देशाचा अभिमान वाटेल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

त्या केवळ ब्रिटनच्या राज्यप्रमुख नव्हत्या. त्या कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांच्याही राष्ट्रप्रमुख होत्या. राष्ट्रकुल संघटनेशी त्या खूप संलग्न होत्या. त्यांना भारतासह राष्ट्रकुल देशांचाही मोठा पाठिंबा होता. त्यांना या देशांबद्दल आत्मीयता होती. कारण या सर्व पूर्वीच्या ब्रिटिश वसाहती होत्या. जगभरात ज्या समस्या आहेत, त्यावर एकत्र बसून उपाय शोधावेत, अशी त्यांची भूमिका होती. एलिझाबेथ यांच्यानंतर आता राष्ट्रकुलचे काय होणार, असाही प्रश्न आहे. भारत आणि आफ्रिकी देश ज्यात समाविष्ट आहेत, अशा या संघटनेबाबत नव्या शासकांना तेवढी आत्मीयता असेल का, हा प्रश्न आहे.

भारताचा विचार केला तर राणीसाहेब तीन वेळा भारतात आल्या. त्यांना भारताची ओढ आहे, हे या भेटींमध्ये दिसून आले. भारतानेही त्यांचे जोरदार स्वागत केले. आपल्या अखेरच्या भेटीत त्यांनी जालियनवाला बागेतील घटनेचा उल्लेख केला होता. ही घटना दुर्दैवी होती, असे त्यांनी म्हटले होते. ज्यावेळी त्या परदेश दौर्‍यावर जात असत, तेव्हा ब्रिटिश राजघराण्याचे प्रतिनिधित्व न करता त्या ब्रिटिश राष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत असत. राष्ट्रप्रमुख म्हणून त्यांचे प्रतिनिधित्व लोकांना नेहमीच आवडत असे. बर्‍याच वेळा असे घडले की, अनेक देशांना ब्रिटनचे धोरण आवडले नाही. परंतु त्या देशांचे राणी एलिझाबेथ यांचा सन्मान करण्याविषयी अजिबात दुमत नव्हते. राणीसाहेबांच्या या सॉफ्ट पॉवरचा जगभरात अनेकदा फायदाही झाला. जेव्हा जेव्हा ब्रिटनच्या काही खास गोष्टी समोर आल्या, तेव्हा त्यात राणीसाहेब सर्वोच्च स्थानी असायच्या. कारण त्या जगातील अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होत्या. जगात कुठेही गेले तरी प्रत्येकजण त्यांना ओळखतो. जगात आपली शक्ती क्षीण झाली, असे ब्रिटनला वाटत होते. परंतु काही गोष्टी अशा आहेत, ज्या जगात दुर्मीळ आहेत. राणी एलिझाबेथ द्वितीय या त्यापैकीच एक होत्या.

हर्ष व्ही. पंत,
किंगस्टन विद्यापीठ, लंडन

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news