जयपूर : श्रावण महिन्यात शिवपूजेचे वेगळेच महत्त्व आहे. त्यानिमित्ताने अनेकांची पावले शिवमंदिरांकडे वळतात. आपल्या देशात तर सर्वत्र नवी-जुनी शिवमंदिरे आढळून येतात. त्यापैकी काही शिवमंदिरांचे स्वतःचे वेगळे वैशिष्टही असते. असेच एक अचलेश्वर महादेव मंदिर आहे.
राजस्थानमधील माऊंट अबू येथेही एक अनोखे शिवमंदिर हे. अचलेश्वर महादेव मंदिर या नावाने ओळखल्या जाणार्या या शिवमंदिरातील शिवलिंग दिवसातून तीनवेळा वेगळ्या रंगात दिसून येते.
हे मंदिर माऊंट अबूपासून सुमारे अकरा किलोमीटरवरील अचलगढ पर्वतावर आहे. तेथील शिवलिंग सकाळी लालसर दिसते तर दुपारी केशरी रंगाचे दिसते. रात्रीच्या वेळी हे शिवलिंग काळसर रंगाचे दिसते. हा पर्वत एकेकाळी डगमगत असताना शिवशंकरांनी तो आपल्या अंगठ्याने स्थिर केला होता अशी कथा सांगितली जाते.
या अंगठ्याचा ठसा आजही दाखवला जातो. तिथेच आता एक कुंडही आहे. मंदिराजवळच अचलगढ किल्लाही आहे. परमार राजवंशातील राजांनी हा किल्ला बनवला होता व नंतर महाराणा कुंभा यांनी त्याचा जीर्णोद्धार केला होता. सध्या त्याचे भग्नावशेषच पाहायला मिळतात.