अगतिक वारसा

अगतिक वारसा
Published on
Updated on

काय आबुराव? दिसला नाहीत दोन-तीन दिवसांत.
पाय जायबंदी झालाय.
या वयातही पाऊल वाकडं पडतं तुमचं?

असले विनोद करण्यापूर्वी माझ्या पायाची कंडिशन बघा.
बघू? अरे बापरे. अजूनही सूज दिसत्ये की घोट्यापाशी. कुठे एवढा पराक्रम करायला गेला होतात?
गडावर गेलोतो. वारसा जपायचा होता ना त्या दिवशी?
हां हां, जागतिक वारसा दिन झाला नाही का एवढ्यात?

झाला. 18 एप्रिल. तिकीट न काढता गडावरपर्यंत जायची, म्युझियम बघायची खास सवलत होती त्या दिवशी. म्हणून वाटलं जावं! पण, कसलं काय? पस्तावायचीच वेळ आली.
का? गड चढून पार घामटा निघाला म्हणून का? सवय असावी लागते त्याची शरीराला. एक मजला चढायलासुद्धा लिफ्टसाठी थांबून राहणारे लोक आपण!
तेवढं काही नाही बरंका. तसा अजून घट्टमुट्ट आहे मी; पण गडावरची वाट जागोजागी उखडलेली होती हो. अडकलं पाऊल एका खबदाडीत. मुळात पाच पावलं सरळ जाता यील तर शपथ! गडावर एक धड रस्ता करायला काय जातं कोण जाणे!
आपले मावळे अशा रस्त्यांवरून घोड्यावरून सामानसुमानसुद्धा घेऊन जायचे.
माझ्याकडे घोडा नव्हता. म्हणून मग मीच गाढवासारखा एकेक खडबडीचा टप्पा काटत काटत!
किती वैतागताय आबुराव?

मग, काय करावं सांगा. धड रस्ता, गड चढणार्‍यांसाठी मध्येमध्ये टेकायला सावलीच्या जागा, पिण्याच्या पाण्याची सोय, एवढ्या माफक सोयीही नसाव्यात?
आणि स्वच्छतागृह?
ते तर बोलायलाच नको. त्यांची आठवण आली, तरी घाण वाटायला लागते. पर्यटक बायाबापड्यांची फार आबाळ होते आणि ही म्हणे वारसास्थानं!

स्वच्छतागृह असतील ना बांधलेली?
आहेत. पण, एकाचं दार नीट लागेल तर शपथ! नळ नाहीत, नळ असले तर पाणी नाही. बाकंसुद्धा उखडलेली ठिकठिकाणी.
म्हणजे सोयी केल्या होत्या; पण आपल्या लोकांनी त्यांची वाट लावली. त्या दिवशी तर जास्तच गर्दी असेल ना तिथे?
खूप. मोफत प्रवेश ठेवला होता ना त्या वारसा दिनासाठी? शिवाय आपल्याकडे काहीही फुकट मिळतंय म्हटल्यावर माणसं पळत सुटायचीच!

एरेव्हीचं सोडा; पण अशा वारसास्थळांना लोकांनी भेट देणं चांगलंच आहे की! पोराबाळांना त्याशिवाय आपला वारसा, आपलं जुनं वैभव कसं कळावं?
फुटके बुरूज, दरडी चुकवत चुकवत, घशाला शोष पाडत चालण्याची कसरत, हे वैभव? मुलांच्या, युवकांच्या मनावर आपल्या वारसास्थळांची ही अनास्था बिंबवायची?
नक्कीच नाही; पण त्यांची पण काही कमी चापलुसी चालत नसते बरं का! प्रत्येक कमानीवर, दरवाजावर आपल्या प्रेयसींची नावं कोरून ठेवायची, हृदयाच्या लाल बदामातून तिरका बाण रंगवायचा खरंच की! 'आय लव्ह यू' तर जागोजागी होतं परवाच्या किल्ल्यावर. पुढे आपल्या वारसांना आपल्या प्रेमाच्या या अमर खुणा दाखवायला न्यायचा प्लॅन असणार एकेकाचा. उगाच डाऊट नको खायला कोणी यांच्या प्रेमावर!

शिवाय फिरताना जागोजागी थुंकणं, गुटख्याच्या पुड्या चौफेर भिरकावणं, थंड पेयांच्या प्लास्टिकच्या बाटल्यांची कोपर्‍या कोपर्‍यात आरास मांडणे हे प्रकार असणारच. आपण आपला वारसा कसा सांभाळतोय? हा आपल्या सुसंस्कृतपणाचा आरसा असतो, हे कधी कळणार आपल्याला? आहे खरं! म्हणून तर फार जागतिक वारसा दूरच राहिला. आम्ही आपला अगतिक वारसाच बघून आलो अन् काय!
त्यांचं पावित्र्य आणि पात्रता टिकवण्याची बुद्धी राहू दे, अशी प्रार्थना करूया! दुसरं आपल्या हाती काय आहे?

– झटका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news