अकरा हजार कोटींच्या पालखी मार्गाला गती

अकरा हजार कोटींच्या पालखी मार्गाला गती

देहूरोड ; पुढारी वृत्तसेवा : दरवर्षी आषाढी-कार्तिकीला पंढरीची वाट चालणार्‍या लाखो वारकर्‍यांसाठी उभारण्यात येणार्‍या तब्बल 11 हजार कोटी रुपयांच्या 'पालखी मार्गाला' गती देण्यात येत असल्याची आनंदवार्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची जन्मभूमी देहूमध्ये मंगळवारी दिली. पंंतप्रधानांनी पालखी मार्गाच्या जीर्णोद्धाराची ही बातमी देताच इंद्रायणीच्या काठी जमलेल्या वारकरी समुदायाने टाळ्यांचा कडकडाट करीत एकच जयघोष केला.

संत परंपरेची महती गाणार्‍या ओव्या, अभंगांना अभ्यासपूर्ण संत विवेचनाची जोड देत मोदींनी देहूमध्ये इंद्रायणीच्या तीरी हजारो वारकर्‍यांची मने जिंकली. निमित्त होते संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्याचे. या मंदिरातील ही शिळा फक्त शिळा नसून भक्ती आणि ज्ञान मार्गाची आधारशिला आहे, असे उद्गार मोदींनी काढले.

ज्या शिळेवर संत तुकोबाराय आपल्या अभंगांसाठी सलग 13 दिवस बसले, त्या शिळेसाठी उभारलेल्या नव्या मंदिराचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मारुतीमहाराज कुर्‍हेकर, आध्यात्मिक समन्वय आघाडीचे तुषार भोसले व देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे उपस्थित होते.

'धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग…' हा अभंग म्हणताना वारकर्‍यांनी भारलेले वातावरण कवेत घेत मोदींनी खचाखच भरलेल्या सभामंडपातील समस्त वैष्णवांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. कपाळावर टिळा, पगडी आणि उपरणे, अशा वारकर्‍याच्या वेशात मोदींनी समस्त वारकर्‍यांशी संवाद साधला. त्यांच्या अनेक वाक्यांवर 'पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल..'चा जयघोष होत होता.

वारकर्‍यांना पालखी मार्गाची सुखद वार्ता देत मोदी म्हणाले, संत ज्ञानेश्वर माऊली पालखीचा पाच चरणांत, तर संत तुकाराम महाराजांचा तीन चरणांत विकास होत आहे. या महामार्गाच्या विकासासाठी 11 हजार कोटी रुपये खर्च होणार असून सुमारे तीनशे किलोमीटरचे सुसज्ज असे रस्ते गतीने तयार होतील.

शिळा त्यागाची साक्षीदार

तंत्रज्ञानाच्या जोरावर देश प्रगतिपथावर असताना देशातील संतमाहात्म्यांच्या संस्कृतीचा समृद्ध वारसाही आपण पुढे घेऊन जात आहोत, असे सांगताना मोदी म्हणाले, दुष्काळ, भूकबळी पाहून व्यथित झालेल्या संत तुकाराम महाराजांनी आपली सर्व संपत्ती समाजासाठी समर्पित केली. दुःख आणि वेदनेच्या काळात ते आशेचा किरण बनून आले होते. हाच वारसा जगण्याची उमेद देतो. ही शिळा या त्यागाची साक्षीदार आहे. देश सांस्कृतिक मूल्यावर पुढे जात असताना त्यांचे अभंग आपल्याला मार्ग दाखवत आहेत, ऊर्जा देत आहेत.

वारी आध्यात्मिक ऊर्जा

पंढरपूरची वारी असो की मथुरा, काशी, चारधाम येथील यात्रा असो, हीच देशाची खरी आध्यात्मिक ऊर्जा आहे. या यात्रा विविधतेतून राष्ट्रीय एकता दर्शवितात, असे सांगताना मोदी म्हणाले, संत तुकाराम महाराजांनी जातिभेदाच्या भिंती दूर केल्या. त्यांचा हाच विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत. अयोध्येला भव्य मंदिराची उभारणी होत असताना डॉ. आंबेडकरांच्या पंचतीर्थांचा विकास आम्ही करीत आहोत. माणसा-माणसांमध्ये फरक करणे पाप आहे, ही शिकवण आपल्याला संतांनी दिली. हाच विचार घेऊन कोणताही भेदभाव न करता आम्ही काम करीत आहोत. 'जे का रंजले गांजले…' या अभंगाप्रमाणे गरिबांचे प्रश्न सोडविणे यालाच देशाचे प्राधान्य आहे, असे सांगत मोदी यांनी सरकारच्या विविध योजनांचा ऊहापोह केला. वारीमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग असतो. या महिलांच्या सशक्तीकरणासाठीही आम्ही पावले उचलली आहेत, असेही मोदी म्हणाले.

आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. यात पर्यावरणाचे भान सर्वांनी ठेवावे, जलस्रोत निर्माण करावेत. 75 जिल्ह्यांत सरोवर निर्माण करायचे आहेत. प्राकृतिक शेतीकडे शेतकर्‍यांचा कल वाढवायचा आहे, असे ते म्हणाले.

फडणवीस यांनी आपल्या भाषणात तुकाराम महाराजांनी जसे लोकहिताचे कार्य केले, त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी कार्य करीत आहेत, असे सांगितले. नितीन महाराज मोरे यांनी या सोहळ्याचे प्रास्ताविक केले.

दर्शनयोग…

* पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी हेलिपॅडवर आले. * त्यानंतर मोटारीने 14 टाळकरी कमानीजवळ गेले. * तेथून पायी मुख्य मंदिरात पोहोचले. * विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतले. * पंतप्रधानांनी 61 फुटी ध्वजाचे उद्घाटन केले. * प्रभू श्रीराम मंदिरात दर्शन. * श्री हरेश्वर महादेवाचे दर्शन. * इंद्रायणी नदी, भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर व घोरावडेश्वर डोंगराचे दर्शन घेतले. * शिळा मंदिरात जाऊन तुकारामांच्या मूर्तीचे व शिळेचे दर्शन घेतले. * नितीन महाराज, माणिक महाराज, संजय महाराज, संतोष महाराज, भानुदास महाराज, विशाल महाराज, अजित महाराज ही विश्वस्त मंडळी, तसेच देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, तुषार भोसले आदी या वेळी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news