लंडन : अंटार्क्टिका म्हणजेच दक्षिण ध्रुवावरील बर्फाच्या स्तराखाली जितके खोल जाऊ तितके जीवनासाठीची स्थिती अधिकाधिक खडतर होत जाते. अशा ठिकाणी अतिशय थंड आणि अंधारे वातावरण असते. तिथे भोजन उपलब्ध होण्याची शक्यता नगण्यच असते. मात्र, अत्यंत दुर्गम ठिकाणीही तग धरून राहू शकणारे जीव पृथ्वीतलावर अस्तित्वात आहेत. अंटार्क्टिकाच्या बर्फाखालीही संशोधकांनी आता जीवांच्या तब्बल 77 प्रजाती शोधून काढल्या आहेत!
विशेष म्हणजे ही जीवसृष्टी तब्बल सहा हजार वर्षे जुनी आहे. या प्रजातींमध्ये तलवारीच्या आकाराच्या शैवालांचा तसेच काही असामान्य किड्यांचाही समावेश आहे. गरम पाण्याचा वापर करून जर्मनीच्या आल्फ्रे ड वेगेनर इन्स्टिट्यूटच्या टीमने सुमारे 200 मीटर खोलीचे दोन खड्डे काढले होते. टीमने 2018 मध्ये आग्नेय वेडेल सागरात न्यूमेयर स्टेशन-3 जवळ एकस्ट्रॉम आईस शेल्फवर हे खोदकाम केले होते.
खुल्या समुद्रापासून अनेक मैल दूर असूनही वैज्ञानिकांनी याठिकाणी अत्यंत समृद्ध जैवविविधतेचे नमुने गोळा केले. इतकेच नव्हे ही जैवविविधता जमिनीवरील प्रकाश आणि भोजनाची उपलब्धता असणार्या काही नमुन्यांपेक्षाही अधिक समृद्ध आहे. या 77 प्रजातींमध्ये तलवारीच्या आकाराच्या ब्रायोजोअनसारख्या मेलिसेरिटा ओब्लिका आणि सर्पुलिड किड्यासारखे पॅरालाओस्पिरा सिकुला यांचा समावेश आहे.
ब्रिटिश अंटार्क्टिक सर्वेक्षणमध्ये सागरी जैववैज्ञानिक आणि प्रमुख संशोधक डॉ. डेव्हीड बर्नेस यांनी सांगितले की दुर्गम परिस्थितीत शोधण्यात आलेली ही जीवसृष्टी थक्क करणारीच आहे. अंटार्क्टिकाचे सागरी जीवन किती अनोखे आहे हे आपल्याला यामधून दिसून येते. एखाद्या मजबूत अन्नसाखळीला उत्तेजन देण्यासाठी बर्फाच्या स्तराखालीही पुरेसे शैवाल असू शकते हे सुद्धा यामधून आढळले आहे.