मंचर : पुढारी वृत्तसेवा
रात्रीच्या वेळी दुचाकीवरून घरी परतणाऱ्या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने समोरून दुसरे वाहन आल्याने तरुणाचा जीव वाचला. ही घटना वडगाव काशिंबेग गावच्या हद्दीत मंगळवारी २४ मे रोजी रात्री घडली.
याबाबत माहिती अशी की, वडगाव काशिंबेग येथील रोहित अविनाश जंगम हा तरुण मंचर येथे काम करतो. मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आपले काम आटोपून जंगम हा दुचाकीवरून घरी निघाला. मंचर-घोडेगाव रस्त्यावर वडगाव फाटा येथे त्याने गावाकडे जाण्यासाठी दुचाकी वळवली. 200 मीटर अंतरावर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बिबट्या दबा धरून बसला होता. दुचाकी जवळ येताच बिबट्याने दुचाकीवर झेप टाकली. यावेळी तत्परता दाखवून जंगम याने गाडीचा वेग वाढवला. बिबट्याने दुचाकीचा पाठलाग सुरू केला. मात्र त्याचवेळी समोरून एक दुचाकी आली. तिचा प्रकाशझोत बिबट्याच्या अंगावर पडल्याने त्याने पाठलाग सोडून तो तेथून निघून गेला.
बिबट्याने जंगम याच्यावर झडप मारली; मात्र हा हल्ला चुकला गेला. जंगमच्या सॅंडलमध्ये बिबट्याच्या पायाचे नख रुतले गेले. घाबरलेल्या जंगम याने गावात जाऊन घडलेला प्रकार ग्रामस्थांना सांगितला. यापूर्वीही दोन वेळा जंगम याला बिबट्याचे दर्शन झाले आहे. या घटनेने वडगाव काशिंबेग परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. वनखात्याने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
कामानिमित्त उशिरा मंचर येथे थांबावे लागते. त्यामुळे रात्री घरी येत असताना बिबट्याची भीती जाणवते. माझे नशीब बलवत्तर असल्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यातून वाचलो.
– रोहित जंगम, हल्ल्यातून वाचलेला युवक