कोल्हापूरच्या तरुण दाम्पत्याचा अमेरिकेत अपघात; आय.टी. इंजिनिअर पत्नीचा मृत्यू

कोल्हापूरच्या तरुण दाम्पत्याचा अमेरिकेत अपघात; आय.टी. इंजिनिअर पत्नीचा मृत्यू

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अमेरिकेतील डेट्रॉईट शहरात 4 मार्च रोजी झालेल्या भीषण अपघातात कोल्हापुरातील 30 वर्षीय आय.टी. इंजिनिअर ऐश्वर्या पार्थ भिवटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे; तर पती पार्थ जखमी झाले आहेत. पतीसोबत तीन वर्षांपूर्वी लग्न होऊन अमेरिकेला गेलेल्या ऐश्वर्या यांचे स्वप्न अर्ध्यावरच राहिले आहे.

पार्थ भिवटे हे कोल्हापुरातील उद्योजक भारत भिवटे यांचे सुपुत्र असून, डेट्रॉईटमधील फोर्ड कंपनीत ते कार्यरत होते. पत्नी ऐश्वर्या यांच्यासह ते अमेरिकेत स्थायिक झाले होते. ऐश्वर्या यांनी अमेरिकेत नोकरीसाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम नुकताच पूर्ण केला होता आणि पुढच्या महिन्यापासून त्या नोकरीत रुजू होणार होत्या; पण नियतीला वेगळेच मान्य होते.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 मार्च रोजी रात्री 8 च्या सुमारास सुट्टी असल्याने पार्थ आणि ऐश्वर्या खरेदीसाठी कारने बाहेर पडले होते. डेट्रॉईट शहरातील एका चौकातून डावीकडे वळत असताना उजव्या बाजूने आलेल्या कारने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव—ता इतकी होती की, चालक सीटच्या बाजूला बसलेल्या ऐश्वर्या यांचा जागीच मृत्यू झाला; तर पार्थ जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ऐश्वर्या आणि पार्थ यांच्या सुखी संसाराचे स्वप्न क्षणार्धात भंगून गेले. कोल्हापुरातील भिवटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ऐश्वर्या यांचे पार्थिव विमानाने बुधवारी कोल्हापुरात आणण्यात येणार आहेे.

logo
Pudhari News
pudhari.news