पुणे : ऑनलाइन कर्ज घेऊन तरुणी अडकली बदनामीच्या घेर्‍यात

पुणे : ऑनलाइन कर्ज घेऊन तरुणी अडकली बदनामीच्या घेर्‍यात
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा : ऑनलाइन लोन अ‍ॅप मधून घेतलेले कर्ज फेडूनही पुन्हा पैसे भरण्यासाठी तगादा लावत तरुणीचे फोटो मॉर्फ करून ते फोटो तिच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधील लोकांना पाठविल्याने ती बदनामीच्या घेर्‍यात अडकल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

याबाबत येरवडा येथे राहणार्‍या एका 19 वर्षीय तरुणीने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विनयभंग, खंडणी, धमकावणे, आयटी अ‍ॅक्टनुसार मोबाईलधारक व्यक्तींवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीही एका फायनान्स कंपनीत नोकरीला आहे. तिच्या मोबाईलवर ऑनलाइन कर्जाबाबत एक लिंक आली होती. पहिली लिंक डाऊनलोड केल्यानंतर तिने त्या अ‍ॅपवर आपली सर्व वयक्तीक माहिती भरली. त्या आधारे तिला काही कर्ज मिळाले. त्यानंतर तिला कालांतराने दोन वेगवेगळ्या लिंक आल्या. त्याही तिने क्लिक करून त्या आधारे कर्ज मिळवले.

अशा प्रकारे तिने हँडी लोन अ‍ॅप आणि फ्युचर वॉलेट असे अ‍ॅपच्या माध्यमातून 13 हजारांचे कर्ज मिळवले. ते कर्ज तिने वेळेत फेडूनही तिला वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून कर्ज फेडण्याबाबत फोन येऊ लागले. त्याद्वारे तिला अतिरिक्त पैशाची मागणी होऊ लागली. परंतु, तिने सर्व पैसे दिल्यानंतरही वारंवार फोन येत असल्याने मोबाईलधारक व्यक्तींना तिने दाद दिली नाही.

मॉर्फ फोटो टाकून बदनामी

युवती दाद देत नाहीहे बघून मोबाईलधारक व्यक्तींनी तिच्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवर तिचा चेहरा असलेला नग्न अवस्थेतील फोटो मॉर्फ करून टाकला. परंतु तरुणीने त्याकडेही दुर्लक्ष केले. मोबाईलधारक आरोपी यावरही थांबले नाही. त्यांनी तरुणीचे मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्ट हॅक करून त्या मोबाईल नंबरच्या व्हॉट्सअपवर तिचे मॉर्फ केलेले नग्न अवस्थेतील फोटो पाठवून तिची बदनामी केली. हा प्रकार तरुणीला समजल्यानंतर तिने येरवडा पोलिस ठाणे गाठून संबंधित मोबाईलधारक व्यक्तींविरोधात फिर्याद दिली आहे. आता याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, गुन्ह्याचा तपास गुन्हे निरीक्षक उत्तम चक्रे आणि पोलिस अमंलदार अदिनाथ खेडकर करत आहे.

कर्जाच्या अ‍ॅपच्या लिंक पाठवून मेसेज पाठवून कर्जाचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगण्याचे प्रकार वाढत आहेत. त्याला तरुणाईही इन्स्टंट कर्ज मिळत असल्याने भुलत आहे. असाच काही प्रकार या गुन्ह्यात घडला आहे. तरुणीला ऑनलाइन कर्ज देऊन नंतर तिने दिलेल्या वयक्तीक माहितीचा वापर करून तिला कर्ज फेडूनही अतिरिक्त पैशाची मागणी करत तिचे फोटो मॉर्फ करून बदनामी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे थोड्याशा ऑनलाइन कर्जाला बळी पडू नका. ते खंडणी उकळण्याचे माध्यम झाले आहे. लोन अ‍ॅपवरून कर्ज घेणे म्हणजे या दृष्ट चक्रात स्वतःला अडकवून घेणे असेच म्हणावे लागेल.

                              – उत्तम चक्रे, गुन्हे निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news