Yoga For Winter : ‘ही’ योगासने करा आणि हिवाळ्यात अधिक उबदार राहा

Yoga For Winter : ‘ही’ योगासने करा आणि हिवाळ्यात अधिक उबदार राहा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: थंडीची सुरूवात होताच आपल्या जीवनशैलीतही बदल होतो. बोचऱ्या थंडीमुळे आपल्या अंगातील आळस देखील वाढतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात सकाळी उठणे असह्य होते. त्याहून अवघड म्हणजे अंगात त्राण आणून योगासने (Yoga For Winter) करणे. या दिवसात सकाळी उठणे असह्य झाल्याने आपण अंथरूनातच पडून राहतो. यामुळे दिवसभर अंगातील आळस वाढतो आणि आपला दिवसही निरूत्साही जातो.

आपल्या शरिराला चांगल्या सवयी लागण्यासाठी तसेच जीवनशैलीत बदल (Yoga For Winter) करण्यासाठी हिवाळा हा ऋतू महत्त्वाचा समजला जातो. याच दिवसात अनेकजण मॉर्निंग वॉक, व्यायाम, योगासने यांसारख्या सवयी लावून घेतात. वाजणारा अलार्म बंद करून पुन्हा अंथरूणात पडून राहणे हे अधिक मोहक वाटते. हिवाळ्याच्या सकाळची सुरुवात योगाने केल्यास तुमचे शरीर उबदार होते. तसेच हिवाळ्यात स्नायूंमध्ये येणारा जडपणा आणि सांधेदुखीच्या सामान्य समस्यांपासून दूर राहण्यासाठी योगासने तुम्हाला मदत करतील. या हिवाळ्यात तुम्हाला देखील उत्साही राहायचे असल्यास ही योगासने करा आणि दिवसभर फ्रेश आणि उत्साही राहा.

Yoga For Winter: हिवाळ्यात उबदार राहण्यासाठी ही योगासने करा

सूर्यनमस्कार (Sun Salutation)

सकाळी सूर्योदयानंतर, श्वासाचे नियमन करून एका विशिष्ट क्रमाने १० किंवा १२ पवित्रे करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात. नमस्कार घालताना मस्तक, छाती, दोन हात, दोन पावले आणि दोन्ही गुडघे ही अष्टांगे जमिनीला प्रत्यक्ष लागतात. दृष्टी, वाणी आणि मन यांचा मानसिक उपासनेत समावेश होतो. नमस्काराला सुरुवात करताना दृष्टी समोर वा नासिकाग्राकडे ठेवली, म्हणजे मन एकाग्र होण्यास मदत होते. सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपल्या स्मरणशक्तीचाही विलक्षण विकास होतो. या आसनाने शरीर अधिक उबदार होण्यास मदत होते.

भुजंगासन (Bhujangasana)

या आसनात शरीराची रचना फणा काढलेल्या नागाप्रमाणे दिसते म्हणून या आसनाला भुजंगासन हे नाव प्राप्त झाले आहे. हे आसन करताना जमिनीवर सतरंजीसारखे जाड आसन घालून त्यावर पालथे म्हणजे पोटावर झोपावे. दोन्ही पाय सरळ व एकमेकांस लागून ठेवावे. या आसनात मेरुदंडाच्या वरच्या भागाला बाक मिळतो. मान व पाठीचा वरचा भाग मागे ताणला गेल्यामुळे मणक्यांना धरून ठेवणारे स्नायू व स्नायुबंध बळकट होतात. मेरुदंडाची लवचिकता वाढते. हे आसन केल्यामुळे मानेचे आणि पाठीचे दुखणे उद्भवण्याची शक्यता कमी होते.

पश्चिमोत्तानासन

पश्चिमोत्तानासन हे एक योगासन आहे. 'पश्चिम' या शब्दाचा एक अर्थ 'पाठीमागची बाजू' असाही होतो. या आसनात मानेपासून पायांच्या घोट्यापर्यंतच्या सर्व पाठीमागच्या शरीराच्या भागास ताण मिळतो म्हणून याला पश्चिमोत्तानासन म्हणतात. या आसनाच्या नियमित सरावामुळे पोटावरील चरबी कमी होते. याच्या सरावामुळे पित्ताशय, जठार, आणि मूत्राशय या सारख्या पोटामधील अवयवांना भरपूर व्यायाम मिळतो. तसेच या योगासनामुळे पचनशक्ती सुधारते आणि पोटाचे आरोग्य मजबूत होते.

त्रिकोनासन

हे आसन करताना शरीराचा आकार त्रिकोणासारखा दिसतो म्हणून या आसनाला त्रिकोणासन म्हणतात. कृती : आसनपूर्व स्थितीमध्ये दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवून दोन्ही तळहात दोन्ही मांड्यांजवळ ठेवून आरामात उभे राहावे. त्यानंतर दोन्ही पाय जवळ घेऊन हात शरीराच्या बाजूला ठेवून स्थिर उभे राहावे. या आसनाने कंबर, माकडहाड, मांडीचे सांधे आणि स्नायू, खांदे, छाती आणि पाठीचा मणका लवचिक बनतात. पाय, गुडघे, घोटे, हात आणि छाती यामध्ये बळकटी येते. पचनक्रिया, श्वसनक्रिया सुधारण्यास मदत होते.

बालासन

बालासनामुळे नितंब (हिप्स), मांड्या आणि पायाच्या टाचा, बोटांमध्ये ताण निर्माण होतो. तसेच कंबर, मान आणि खांदे मजबूत होण्यासदेखील मदत होते. बालासन हे आसन खरे म्हणजे योग करतानाची विश्रांतीची मुद्रा समजली जाते. या आसनाच्या नियमित सरावामुळे मेंदू आणि मन शांत राहते. स्मरणशक्ती वाढण्यासाठी खूप मदत होते. या आसनाच्या सरावामुळे शरीरात नवचैतन्य निर्माण होते.

पूर्ण शलभासन

'शलभ' किंवा 'शरभ' या शब्दाचा अर्थ टोळ किंवा नाकतोडा असा आहे. या आसनाची अंतिम स्थिती बसलेल्या नाकतोड्याप्रमाणे दिसते म्हणून या आसनाचे नाव शलभासन असे आहे. हे आसन शरीरसंवर्धनात्मक प्रकारात मोडते. हे आसन एकावेळी फक्त एका पायाने केल्यास त्याला अर्धशलभासन म्हणतात. या आसनात ओटीपोट, कंबर, मांड्यांचा वरचा भाग ताणला जातो व पोटावर दाब पडतो. श्वसन चालू ठेवल्याने तेथील रक्ताभिसरण चांगले होते. नितंब, कंबर व मांड्या सशक्त व प्रमाणबद्ध होतात. कंबरेचे दुखणे उद्भवत नाही. श्वसनतंत्र सुधारल्याने सर्दी खोकला होत नाही. साधकाची प्रतिकारशक्ती वाढते. फुप्फुसांची कार्यक्षमता सुधारते. थकवा दूर होतो. दिवसभर उत्साह टिकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news