नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क– नाशिकचे हेमंत गोडसे व दिंडोरीच्या भारती पवार असे दोनही महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्यांनी विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे. दोघांनीही आपल्या मतदारसंघात केलेले काम पाहाता व मोंदीनी जे काम केलं आहे ते पाहाता आम्हाला तशी खात्री आहे. जे काम पन्नास ते साठ वर्षात कॉंग्रेसला करता आले नाही ते मोदींनी दहा वर्षात केलं आहे. आपल्या राज्यात देखील दोन वर्षात महायुतीने केलेला विकास व सर्वसामन्यांसाठी घेतलेले निर्णय तसेच सुरु केलेल्या योजना याची पोच- पावती नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे व भारती पवार यांचा उमेदवारी अर्ज आज (दि. 2) दाखल करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, दादा भुसे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. उमेदवारी जाहीर करण्यास उशीर झाल्यामुळे काही परिणाम होईल का असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाल आमच्याकडे निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन काम होत नाही. चोवीस तास आमचे काम चालू असते. आम्ही फेसबुक लाईव्ह किंवा घरीबसून काम करत नाही. निवडणूका असो नसो लोकांच्या मदतीला आम्ही कायम धावून जात असतो त्यामुळे विजय आमचा पक्का असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटाबद्दल विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, होय, उद्धव ठाकरेंनी मलाही मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री करतो तुम्ही परत या असे आमिष दाखवले. मलाही निरोप दिला व दिल्लीलाही त्यांनी प्रयत्न केले. पण मी मुख्यमंत्री पदासाठी कधी गेलोच नव्हतो. बाळासाहेबांच्या विचारांना त्यांनी मुठमाती दिली. त्यामुळे फडणवीस जे बोलले आहेत त्यात तथ्य आहे, फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याबाबत ठाकरेंनी फोन केला होता असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले आम्ही बाहेर पडलो तेव्हा, देवेंद्र फडणवीसांनी ऑफर देण्यात आली होती. आम्ही बाहेर पडलो तेव्हा त्यांनी तसे प्रयत्न केले. तुम्हाला मुख्यमंत्री करतो पुन्हा या म्हणून मलाही सांगितलं. त्यांनी दिल्लीलाही फोन केला होता, तुम्ही त्यांना का घेताय. आम्ही सगळी शिवसेना घेऊन येतो असे ते म्हणाले होते. पण त्यांच्याकडे शिवसेना राहिली नव्हती. 50 लोक माझ्यासोबत होते. फडणवीस जे बोलले आहेत त्यात सत्यता आहे. मी अजून खूप काही बोलू शकतो, पण बोलणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच ठाण्यातील उमेदवारीवर बोलताना, नरेश म्हस्के हे संजीव नाईकांना भेटले ते महायुतीचेच काम करणार आहे. ही निवडणूक देशाला पुन्हा महासत्ताक करण्यासाठी आहे, मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आहे. प्रत्येक जण इच्छुक असतोच, कार्यकर्त्यांची इच्छा असतेच पण एकदा पक्षाने निर्णय घेतला की महायुतीत सगळे एकत्र येतात असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान आज महायुतीच्या रॅलीदरम्यान शालीमार येथे ठाकरेंचे शिवसैनिक व महायुतीचे पदाधिकारी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. महायुतीचा प्रचार सुरु असताना ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी मशाली पेटवल्या व घोषणाबाजी केली. त्यावर विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, ठाकरेंच्या शिवसेनेकडे शिव्या शाप देणे एवढच काम आहे. या निवडणूकीनंतर त्याच्याकडे तेही काम उरणार नसल्याची टीका त्यांनी केली.
हेही वाचा –