कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा ‘यलो अलर्ट’

कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा ‘यलो अलर्ट’

पुणे, पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर रविवारी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. राज्यात पावसाचा जोर वाढणार असून गुरुवारपर्यंत सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान खात्याच्या वतीने मराठवाडा, विदर्भ, त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह कोकण आणि गोव्यातही पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यातील हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विटही केले आहे.

पुणे जिल्ह्याच्या काही भागांत अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस पडल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर गोंदियासह चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. महिन्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी त्यामुळे सुखावला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सप्टेंबरच्या सुरुवातीपासून पावसाने राज्याच्या काही भागांमध्ये हजेरी लावली आहे. बुलडाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडला. तथापि, शेतकर्‍यांना आणखी दमदार पावसाची अपेक्षा आहे. गडचिरोली जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.

सप्टेंंबरची सुरुवात चांगली झाली असून राज्यात हलका ते मध्यम पावसाला सुरुवात झाली आहे. आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्याने पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण आणि विदर्भात गुरुवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात 7 सप्टेंबरपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान, बारामती शहर आणि तालुक्याला रविवारी दुपारी चारनंतर मुसळधार पावसाने झोडपून काढले. सुमारे तासभर ढगफुटीसद़ृश पाऊस झाला. त्यामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली जाऊन जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news