पुढारी ऑनलाईन डेस्क : Yashasvi Jaiswal 1000 Runs : भारताचा डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. भारतासाठी कमीत कमी सामन्यांमध्ये 1000 कसोटी धावा करणारा तो फलंदाज ठरला आहे. त्याने चेतेश्वर पुजारा आणि विनोद कांबळी या महान फलंदाजांचे विक्रम मोडीत काढले आहेत. धर्मशाला येथील एचपीसीए क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात यशस्वी जैस्वालने ही कामगिरी केली.
जैस्वालने पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात 29 वी धावा घेताच कसोटी क्रिकेटमध्ये हजार धावांचा टप्पा गाठला. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 1000 धावा करणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी तो एक बनला. तो केवळ 9 कसोटी सामन्यांमध्ये भारतासाठी 1000 धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला आहे. त्याच्यापेक्षा कमी कसोटी सामन्यांमध्ये भारतासाठी 1000 धावा इतर कोणत्याही फलंदाजाने पूर्ण केल्या नाहीत.
जैस्वालने चेतेश्वर पुजारा आणि विनोद कांबळी यांनाही मागे टाकले आहे. पुजाराने 11 तर विनोद कांबळीने 12 सामन्यांत 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. मात्र, डावाचा विचार केला तर कांबळी हा जैस्वालच्या पुढे आहे. कांबळीने 14 डावात, तर जयस्वालने 16व्या डावात ही कामगिरी केली. त्याचवेळी चेतेश्वर पुजाराला 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 18 डावांची प्रतीक्षा करावी लागली.
सर्वात कमी दिवसांत 1000 कसोटी धावा पूर्ण करणारा यशस्वी जैस्वाल हा भारताचा फलंदाज आहे. त्याने पदार्पणानंतर 239 दिवसांत 1000 धावा पूर्ण केल्या. याबाबतीत दुस-या क्रमांकावर राहुल द्रविड आहे. त्याने 299 दिवसांत ही कामगिरी केली होती. (Yashasvi Jaiswal 1000 Runs)
सर डॉन ब्रॅडमन यांनी केवळ सात कसोटी सामन्यांमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. ते अव्वल स्थानावर आहेत. त्याच्याशिवाय 7 किंवा 8 सामन्यांमध्ये कोणालाही असा पराक्रम करता आलेला नाही. 9 डावात 1000 कसोटी धावा करणारा जैस्वाल हा जगातील चौथा खेळाडू बनला आहे. त्याच्या आधी एव्हर्टन वीक्स, हर्बर्ट सटक्लिफ आणि जॉर्ज हॅडली यांनी ही कामगिरी केली आहे.
जैस्वालने आतापर्यंत पाच सामन्यांच्या 9 डावात 94.29 च्या सरासरीने आणि 77.46 च्या स्ट्राइक रेटने 700 धावा पूर्ण केल्या आहेत. या मालिकेत त्याने आतापर्यंत दोन द्विशतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. तो इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. कोहलीने 2016-17 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत 655 धावा केल्या होत्या. त्या मालिकेत कोहलीने दोन द्विशतकेही झळकावली होती.
जैस्वालने कोहलीच्या मालिकेतील सर्वकालीन सर्वोत्तम धावसंख्येला मागे टाकले आहे. कोहलीने 2014-15 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 692 धावा केल्या होत्या. एका मालिकेत 700 धावा करणारा जैस्वाल हा दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत गावसकर यांचे नाव पहिल्या दोन स्थानांवर येते. त्यांनी 1971 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी मालिकेतील 4 सामन्यांत विक्रमी 774 धावा केल्या होत्या. या दरम्यान त्यांनी 154.80 च्या सरासरीने एका द्विशतकासह 4 शतके आणि तीन अर्धशतके झळकावली. कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा हा भारतीय विक्रम आहे. गावसकर यांनी पुन्हा एकदा 1978-79 च्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील मालिकेदरम्यान त 700 हून अधिक धावा चोपल्या. त्यांनी 6 सामन्यात 91.50 च्या सरासरीने 732 धावा फटकावल्या. या काळात त्यांनी चार शतके झळकावली.