WTC Final : ओव्हलच्या मैदानावर टीम इंडियाचे रेकॉर्ड कसे आहे?

WTC Final : ओव्हलच्या मैदानावर टीम इंडियाचे रेकॉर्ड कसे आहे?

पुढारी ऑनलाईन डेस्क : WTC Final : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होत आहे. उभय संघांमधील हा सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर 7 जूनपासून सुरू होणार आहे. कसोटी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या क्रमांकावर असून कांगारूंचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यामुळे हा ब्लॉकबस्टर सामना अत्यंत चुरशीचा होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, डब्ल्यूटीसीच्या विजेतेपदासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत. रोहित सेना कसून सराव करताना दिसत आहे. सुरुवातीला प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत मोजकेच खेळाडूंनी इंग्लंड गाठले होते, मात्र आयपीएलचा अंतिम सामना होताच सर्वच खेळाडू संघात सामील झाले.

तसे पाहता, ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवणे भारतासाठी सोपे असणार नाही. या मैदानावर टीम इंडियाचे कसोटी रेकॉर्ड चांगले नाही. भारताने या मैदानावर एकूण 14 कसोटी सामने खेळले आहेत. यातील केवळ 2 मध्ये विजय मिळवण्यात यश आले असून 5 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. तर 7 सामने अनिर्णित राहिले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्डही फारसे चांगले नाही (WTC Final)

ओव्हलच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचे रेकॉर्डही फारसे चांगले नाही. कंगारू संघाने या मैदानावर 38 पैकी केवळ 7 सामने जिंकले आहेत, तर 17 सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघांनी 106 सामने खेळले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने 44 सामने जिंकले आहेत, तर भारताने 32 सामन्यांत विजय मिळवला आहे. याशिवाय 29 सामने अनिर्णित राहिले आहेत. तर एक सामना टाय झाला आहे.

टीम इंडियासाठी ही दिलासादायक बाब (WTC Final)

ओव्हलच्या मैदानावर टीम इंडियाने शेवटचा सामना जिंकला होता ही दिलासादायक बाब आहे. सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या त्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यजमान इंग्लंडचा 157 धावांनी पराभव केला होता. त्या सामन्यात रोहित शर्माने 127 धावांची शतकी खेळी साकारून सामनावीराचा बहुमान पटकावला होता.

टीम इंडियाला डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना जिंकून 'आयसीसी ट्रॉफी'चा गेल्या 10 वर्षांपासून सुरू असलेला दुष्काळ संपवायचा आहे. 2013 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरले होते. त्यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धोनी सेनेने इंग्लंडचा पराभव केला होता. त्यानंतर टीम इंडिया कोणत्याही आयसीसी स्पर्धेत चॅम्पियन बनलेली नाही.

टीम इंडियाला 2014 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर एकदिवसीय विश्वचषक (2015) आणि टी-20 विश्वचषक (2016) च्या उपांत्य फेरीतही भारताचा पराभव झाला. चॅम्पियन्स ट्रॉफी (2017), वर्ल्ड कप (2019) आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (2021) मध्येही भारताची अशीच परिस्थिती होती. याशिवाय 2021 आणि 2022 चा टी-20 विश्वचषकही भारतासाठी निराशाजनक होता.

WTC Final चे तपशील

तारीख : 7 ते 11 जून, 2023
स्थळ : ओव्हल ग्राउंड, लंडन
संघ : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
राखीव दिवस : 12 जून

WTC फायनलसाठी टीम इंडियाचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाक, अक्षर पटेल, मोहम्मद ठाक शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news