WTC Final INDvsAUS: भारताला पाचवा झटका, रविंद्र जडेजा बाद

WTC Final INDvsAUS: भारताला पाचवा झटका, रविंद्र जडेजा बाद
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लंडनमधील ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जात आहे. आज (दि. 8) सामन्याचा दुसरा दिवस आहे. लंचब्रेक नंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 469 धावा संपुष्टात आला आहे. ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 163 धावांची खेळी केली. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथने 121 धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 285 धावांची भागीदारी केली. अॅलेक्स कॅरीने 48 आणि डेव्हिड वॉर्नरने 43 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली. मिचेल स्टार्क धावबाद झाला. या मोठ्या धावसंख्येशी बरोबरी साधण्यासाठी भारताला तिसऱ्या दिवसाअखेरपर्यंत फलंदाजी करावी लागणार आहे. भारतीय फलंदाज पहिल्या डावासाठी मैदानात उतरले असून सध्या धावसंख्या 38 षटकांत 5 बाद 151झाली आहे.

भारताला पाचवा झटका, रविंद्र जडेजा बाद

भारताला 142 धावांवर पाचवा धक्का बसला. ऑस्ट्रेलियन ऑफस्पिनर नॅथन लायनने रवींद्र जडेजाला  स्लिपमध्ये झेलबाद केले. जडेजा 51 चेंडूत 48 धावा करून बाद झाला. जडेजा आणि रहाणे यांनी पाचव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. रोहित 15 धावा, शुभमन 13 धावा, पुजारा 14 धावा, विराट 14 धावा करून आधीच पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. फॉलोऑन वाचवण्यासाठी भारताला २६९ धावा करायच्या आहेत.

विराट कोहली स्वस्तात बाद

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडिया अडचणीत असल्याचे दिसत आहे. 71 धावांवर भारताला चौथा धक्का बसला. रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा यांच्यानंतर आता विराट कोहलीही पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. कोहलीला स्टार्कने 18.2 व्या षटकात स्लिपमध्ये स्टीव्ह स्मिथकरवी झेलबाद केले. त्याला 14 धावा करता आल्या.

चेतेश्वर पुजाराही बाद

13.5 व्या षटकात भारताला 50 च्या स्कोअरवर तिसरा धक्का बसला. रोहित शर्मा आणि शुभमन गिलनंतर चेतेश्वर पुजाराही पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. त्याला 25 चेंडूत 14 धावा करता आल्या.

भारताला दुसरा धक्का

6.4 व्या षटकात भारताला दुसरा झटका बसला. बोलँडने त्याला क्लिन बोल्ड केले. गिलने 15 चेंडूत 13 धावा केल्या.

भारताला पहिला धक्का

टीम इंडियाला पहिला झटका 30 च्या स्कोअरवर बसला. कर्णधार रोहित शर्मा 26 चेंडूत 15 धावा करून बाद झाला. त्याला ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने 5.6 व्या षटकात एलबीडब्ल्यू आऊट केले.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडिया बॅकफूटवर होती. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असला तरी ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथने खेळाला कलाटणी दिली. दोघांनी शतकी खेळी साकारली. पण भारताच्या गोलंदाजांनीही जबरदस्त पुनरागमन केले आणि लंच ब्रेकपर्यंत कांगारूंच्या सात फलंदाजांना तंबूत परत पाठवले. लंचब्रेकनंतर काही षटकातच भारतीय गोलंदाजांनी कांगारूंच्या तीन फलंदाजांची शिकार केली.

ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात

121.3 व्या षटकात सिराजने पॅट कमिन्सला अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद केले. याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 469 धावांत संपुष्टात आला.

सिराजने नॅथन लायनला केले बाद

मोहम्मद सिराजने 119.5 व्या षटकात नॅथन लायनला क्लीन बोल्ड करून भारताला नववे यश मिळवून दिले. लिओनने 25 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने नऊ धावा केल्या.

जडेजाने कॅरीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले

453 धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाची आठवी विकेट पडली. अॅलेक्स कॅरी 69 चेंडूत 48 धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाने 114.4 व्या षटकात त्याला पायचीत केले. कॅरीने आपल्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार लगावला.

ऑस्ट्रेलियाची सातवी विकेट

103.5 व्या षटकात 402 धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियन संघाची सातवी विकेट पडली. मिचेल स्टार्क 20 चेंडूत पाच धावा करून बाद झाला आहे. अक्षर पटेलच्या अचूक थ्रोने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 104 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची अवस्था सात बाद 402 होती.

शतक झळकावल्यानंतर स्टीव्ह स्मिथ बाद

स्टीव्ह स्मिथ 268 चेंडूत 121 धावांची शानदार खेळी खेळून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 19 चौकार मारले. शार्दुल ठाकूरने त्याला 98.1 व्या षटकात बोल्ड केले.

शमीने ग्रीनला केले बाद

94.2 व्या षटकात मोहम्मद शमीने भारताला पाचवे यश मिळवून दिले. त्याने कॅमेरून ग्रीनला दुसऱ्या स्लिपमध्ये शुभमन गिलकडे झेलबाद केले. ग्रीनने सात चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने सहा धावा केल्या. दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात दोन गडी बाद करत भारतीय संघाने सामन्यात थोडेसे पुनरागमन केले.

दीड शतकी खेळीनंतर ट्रॅव्हिस हेड बाद

ट्रॅव्हिस हेड दीड शतकी खेळीनंतर बाद झाला. मोहम्मद सिराजने त्याला यष्टिरक्षक केएस भरतकरवी झेलबाद केले. ट्रॅव्हिस हेडने 174 चेंडूत 163 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 25 चौकार आणि एका षटकार लगावला. हेड बाद झाल्यानंतर कॅमेरून ग्रीन मैदानात उतरला.

ट्रॅव्हिस हेडच्या 150 धावा पूर्ण

सामन्याच्या दुस-या दिवशी पहिल्या सत्रात ट्रॅव्हिस हेडने 150 धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथनेही शतक पूर्ण केले आहे. या दोघांनी उत्कृष्ट भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 350 धावांच्या जवळ पोहोचवली. त्यामुळे या सामन्यात कांगारू संघाचे पारडे मजबूत स्थितीत आहे.

स्टीव्ह स्मिथचे शतक

ट्रॅव्हिस हेडनंतर स्टीव्ह स्मिथनेही आपले शतक पूर्ण केले आहे. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात स्टीव्ह स्मिथने आपले 31 वे शतक पूर्ण केले. स्मिथने 229 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. दुस-या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर त्याने दोन चौकार मारून शतकाला गवसणी घातली. ओव्हल मैदानावरील त्याचे हे तिसरे शतक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news