WTC Point Table : न्यूझीलंडच्या विजयानंतर डब्ल्यूटीसी गुणतालिकेत बदल! टीम इंडियाला मोठे नुकसान

WTC Point Table : न्यूझीलंडच्या विजयानंतर डब्ल्यूटीसी गुणतालिकेत बदल! टीम इंडियाला मोठे नुकसान

पुढारी ऑनलाईन डेस्क : WTC Point Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 281 धावांनी विजय मिळवून न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल घडवला आहे. किवी संघ आता पहिल्या स्थानी पोहचला आहे. ज्यानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या आणि भारत तिस-या क्रमांकावर घसरला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसोबतच न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातही 2 सामन्यांची कसोटी मालिकाही खेळवली जात आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्याच्या निकानंतर डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत बदल होत आहे. (WTC Point Table)

कांगारूं दुस-यास्थानी (WTC Point Table)

नुकताच न्यूझीलंड विरुद्ध द. आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना पार पडला. त्यात किवींनी द. आफ्रिकेचा पराभव करून डब्ल्यूटीसी गुणतालिकेत 66.66 विजयी टक्केवारीसह पहिले स्थान पटकावले. डब्ल्यूटीसी 2023-25 च्या हंगामात न्यूझीलंडने आतापर्यंत 3 पैकी 2 कसोटी जिंकल्या आहेत. तर एक गमावली आहे. गुणतालिकेत कांगारूंचा संघ दुस-या स्थानावर आहे. त्यांनी 10 पैकी 6 कसोटी जिंकल्या असून 3 गमावल्या आहेत. त्यांच्या विजयाची टक्केवारी 55 आहे.

भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर (WTC Point Table)

न्यूझीलंडच्या विजयामुळे भारतीय संघाचे नुकसान झाले आहे. 52.77 विजयी टक्केवारीसह रोहित सेना तिस-या स्थानावर पोहोचली आहे. भारतीय संघाने डब्ल्यूटीसी 2023-25 च्या पर्वात ​​भारताने आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यातील 3 जिंकले असून 2 गमावले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे. इंग्लंडविरुद्ध मालिकेतील अजून 3 सामने शिल्ल्क आहेत. या सामन्यांत विजय मिळवल्यास भारत पुढील काळात नक्कीच गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचेल.

इतर संघांची स्थिती काय आहे?

बांगलादेशची विजयाची टक्केवारी 50 आहे. या संघाने आतापर्यंत एक कसोटी जिंकली असून एक सामना गमावला आहे. ते चौथ्या स्थानावर आहेत. पाकिस्तानची विजयाची टक्केवारी 36.66 टक्के आहे. त्यांनी 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत. वेस्ट इंडिज 4 सामन्यात 1 विजयासह सहाव्या स्थानावर आहे. तर द. आफ्रिका 3 सामन्यात 1 विजय मिळवून सातव्या स्थानावर आहे. इंग्लंडने 7 सामने खेळले आहेत. ज्यातील त्यांनी 3 जिंकले आहेत. ते आठव्या स्थानावर आहेत. श्रीलंका 3 सामन्यात 1 विजयासह नवव्या स्थानावर आहे.

असा झाला न्यूझीलंड विरुद्ध द. आफ्रिका सामना

न्यूझीलंडने पहिली कसोटी सहज जिंकली. पहिल्या डावात किवी संघाने रचिन रवींद्र (240) आणि केन विल्यमसन (109) यांच्या खेळीच्या जोरावर 511 धावांचा डोंगर रचला. द. आफ्रिकेच्या नील ब्रँडने 6 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात प्रोटीज संघाचा डाव अवघ्या 162 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर किवींनी द. आफ्रिकेला फॉलोऑन न देता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दुसरा डाव 179 धावांवर घोषित केला. विल्यमसनने (109) दुसऱ्या डावातही शतक झळकावले. 529 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना द. आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या 247 धावांवर संपला. अशाप्रकारे न्यूझीलंडने हा सामना 281 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news