पुणे, पुढारी वृत्तसेवा: साहित्य अकादमीचे 2022 साठीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. इन गुड फेथ या सबा नक्वी लिखित इंग्रजी पुस्तकाचा सलोख्याचे प्रदेश – शोध सहिष्णू भारताचा या मराठी अनुवादासाठी पुण्यातील लेखक प्रमोद मुजुमदार यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
समाजामध्ये धार्मिक सलोखा नांदावा यासाठी जे काम करतो आहे. त्यासाठीचे महत्त्वाचे पुस्तक आहे म्हणून ते मराठीमध्ये अनुवादित केले. त्याला राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. मूळ पुस्तक सबा नक्वी यांनी इंग्रजीमध्ये लिहिले आहे. भारतातील संयुक्त धार्मिक स्थळे आणि परंपरा या विषयावर हे पुस्तक आहे. भारतभर भ्रमण करून गोळा केलेल्या माहितीचे हे संकलन आहे. त्यामुळे या पुस्तकाला विशेष महत्त्व आहे, जे आजच्या सलोख्याविषयी बोलते. त्यामुळे या पुस्तकाला पुरस्कार मिळणे हा वैयक्तिकरित्या आनंदाची बाब आहे. तसेच एका चांगल्या विषयाच्या पुस्तकाला नव्याने आपण मराठी वाचकांपर्यंत पोहोचवू शकतो ही जास्त महत्त्वाची कामगिरी वाटते असं देखील त्यांनी यावेळी म्हटले.