नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शहरात विविध ठिकाणी कारवाई करीत अल्पवयीन मुलांच्या दप्तरातून धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. याप्रकरणी पंचवटी, इंदिरानगर पोलिस ठाण्यांमध्ये विधिसंघर्षित बालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. दप्तरात वह्या पुस्तकांऐवजी थेट शस्त्रे आढळून आल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार विधिसंघर्षित बालकांसह पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये एक हद्दपारी झालेल्या गुन्हेगाराचा समावेश आहे.
सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शालेय विद्यार्थ्याच्या बॅगेत कोयता सापडला होता. त्यामुळे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विधिसंघर्षित बालकांची शोधमोहीम घेत त्यांना शस्त्र पुरवणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने शहरात कारवाई केली. कारवाईत दोन वर्षांसाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेल्या रोहन शर्मा (रा. बजरंगवाडी) याला शहरातून पकडून त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे. विनापरवानगी शहरात वास्तव्य करून शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अंमलदार विलास चारोस्कर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी काही शाळकरी विद्यार्थ्यांचे दप्तर तपासले असता त्यात शस्त्रे आढळून आली. त्यात क्रांतीनगर, चिंचबन, घारपुरे घाट परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या दप्तरातून पोलिसांनी नऊ धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. याप्रकरणी चौघांविरोधात पंचवटीत, तर एकाविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच पाथर्डी गावातून शुभम दिपके याच्यासह एका अल्पवयीन मुलाकडून पोलिसांनी चाकू व कोयता जप्त केला आहे. दोघांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सातपूर पोलिसांनीही संशयित मिलिंद मुंढे (२१) याच्याकडून कोयता जप्त करीत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शाळेच्या शेवटच्या दिवशी दहशत
दहावीची मंगळवारी (दि.२६) परीक्षा संपली. त्यामुळे शाळेच्या शेवटच्या दिवशी दहशत करण्यासाठी या विधिसंघर्षित मुलांनी दप्तरात धारदार शस्त्रे आणल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्यामुळे किशोरवयीन मुलांमध्ये शस्त्रांचे आकर्षण वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर येत आहे.
पोलिसांची तीन महिन्यांतील कारवाई
शहर पोलिसांनी चालू वर्षात केलेल्या कारवाईतून अनेक शस्त्रे जप्त केली आहेत. त्यात ११ पिस्तुले, ३ देशी कट्टा, २० जिवंत काडतुसे, ११ चाकू, ३५ कोयता, ३ गुप्ती, १० चॉपर व २ इतर शस्त्रे जप्त केली आहेत. याप्रकरणी संशयितांविरोधात गुन्हे दाखल केले