World No Tobacco Day 2023: तंबाखू सेवनाच्या भूलभुलय्यात अडकू नका!

World No Tobacco Day 2023: तंबाखू सेवनाच्या भूलभुलय्यात अडकू नका!
Published on
Updated on

प्रज्ञा केळकर- सिंग

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील सुमारे दीड कोटी जनतेला तंबाखू खाण्याच्या सवयीने जखडले आहे. तंबाखू सोडण्यासाठी उपलब्ध असलेले औषध निकोटीन हे च्युइंगम म्हणून उपलब्ध आहे. औषधे अनेक दिवस नियमितपणे घ्यावी लागतात. रुग्णाला तंबाखू खाण्याची किती वेळा इच्छा होते, यावर औषधांचे प्रमाण ठरवले जाते. व्यसनाधीन होऊन रोगग्रस्त झाल्यावर औषधोपचारांच्या मागे लागण्याऐवजी व्यसनांच्या भूलभुलय्यात अडकू नये, यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत.

ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हेनुसार महाराष्ट्रात 2.5 कोटी लोक तंबाखूचा वापर करतात. जगामध्ये दर वर्षी 50 लाख व भारतात 10 लाख लोकांचा तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांनी मृत्यू होतो. ग्लोबल यूथ टोबॅको सर्व्हेनुसार 13 ते 15 वयोगटातील 14 टक्के मुले तंबाखूचे सेवन करतात. जगभरात कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी तीन ते चार टक्के रुग्णांना मौखिक कर्करोग असतो. भारतात मात्र हे प्रमाण 30 ते 40 टक्के आहे, याचे कारण तंबाखू-गुटखा व्यसन हे आहे. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक औषधांच्या साहाय्याने व्यसनांवर नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी प्रचंड इच्छाशक्तीची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

तंबाखूचे व्यसन असलेल्या व्यक्तींना सुरुवातीला दररोज 8-10 वेळा औषधाचे सेवन करावे लागते. हळूहळू 7-10 दिवसांच्या कालावधीत दररोज डोस शून्यावर खाली येईपर्यंत डोस एक-एकने कमी केला पाहिजे. त्यानंतर, त्या व्यक्तीने पुन्हा तंबाखू खाल्ल्यास निकोटीन रिसेप्टर अवरोधित झाल्यामुळे रुग्ण सेवन थांबवतो. तंबाखू सोडण्यासाठी खूप समर्पण, इच्छाशक्ती, कुटुंबाचा पाठिंबा, चिकाटी आणि वेळ लागतो. तंबाखू किंवा धूम्रपान सोडण्यासाठी कोणतेही औषध 100% प्रभावी नाही. इतर औषधे बुप्रोपियोन आणि वेरिनिकलाइन ही आहेत. ही अँटीडिप्रेसंट औषधे आहेत. औषधांचे काही दुष्परिणामही असू शकतात, त्यामुळे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे घेऊ नयेत.

– डॉ. महावीर मोदी, पल्मोनॉलॉजिस्ट

तंबाखूचे व्यसन सुटावे, यासाठी निकोटिनचा अंश असलेले औषध दिले जाते. सुरुवातीला तंबाखूच्या प्रमाणाइतके औषध दिले जाते. हळूहळू औषधांचा डोस कमी केला जातो. तंबाखू सातत्याने खाल्लयाने तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. अशा वेळी शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. शस्त्रक्रियेनंतर 80 टक्के रुग्णांना त्रास पूर्णपणे नाहीसा होऊ शकतो.

– डॉ. विनोद गोरे, पल्मोनॉलॉजिस्ट

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news