नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : जागतिक स्तरावर आशिया खंड हा हवामान, हवामानबदल आणि पाण्याशी संबंधित नैसर्गिक घटनांचे हॉटस्पॉट बनत आहे. यामध्ये महापूर, वादळ, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटा अशा गंभीर नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. जागतिक हवामान संघटनेच्या ताज्या अहवालात भारतात येऊ शकणार्या हवामान आणि अत्यंत गंभीर हवामान आपत्तींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. यंदाही या हवामान बदलाचा फटका बसण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली आहे.
* आशिया खंडात 79 अत्यंत गंभीर हवामानविषयक आपत्ती
* दोन हजारांहून अधिक लोकांचे बळी झाल्याची नोंद
* 90 लाखांवर जनतेला फटका
गेल्या वर्षी सन 2023 मध्ये जगातील इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा आशिया खंडातील देशांना सर्वाधिक हवामान आपत्तींचा सामना करावा लागला आहे. यामुळे आशियाचा बहुतांशी प्रदेश हा आपत्तीग्रस्त बनला आहे. या संदर्भातील माहिती जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) त्यांच्या अहवालात दिल्याचे वृत्त 'डाऊन टू अर्थ'ने दिले आहे.
जागतिक हवामान संघटनेने स्टेट ऑफ द क्लायमेट इन एशिया' हा नवीन अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. अहवालातील आकडेवारीनुसार, 2023 मध्ये आशिया खंडाला 79 अत्यंत गंभीर हवामान आपत्तींचा सामना करावा लागला. या आपत्तींनी आशिया खंडातील 2,000 हून अधिक लोकांचा बळी घेतला. या आपत्तींमुळे 90 लाखांहून अधिक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले.
सन 2023 मध्ये भारतात एप्रिल आणि जूनमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटांमुळे सुमारे 110 मृत्यू झाल्याची नोंद झाल्याचे म्हटले आहे. तसेच वायव्य पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान विक्रमी उच्चांकावर पोहोचले आणि आर्क्टिक महासागरानेही सागरी उष्णतेची लाट अनुभवल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे.
आशियातील तापमान जागतिक सरासरीपेक्षा खूप वेगाने वाढत आहे. 1961 ते 1990 या कालखंडावर नजर टाकली तर या प्रदेशात तापमान वाढण्याची प्रवृत्ती जवळपास दुप्पट झाली आहे. आकडेवारीनुसार 2023 मध्ये आशियामध्ये नोंदवलेले सरासरी तापमान 1961 ते 1990 च्या सरासरी तापमानापेक्षा 1.87 अंश सेल्सिअस जास्त असल्याचे दिसून येते.
दक्षिण-पश्चिम भारतातील काही भाग, गंगा पाणलोट क्षेत्र आणि ब्रह्मपुत्रेच्या खालच्या भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद करण्याचे हे सलग दुसरे वर्ष होते. 2023 मध्ये 'टायफून' हे चक्रीवादळ आणि आकाशीय आपत्तीने भारतात 1,200 लोकांचा बळी घेतला. दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशला धडकणार्या 'मिचाँग' चक्रीवादळाचाही या अहवालात उल्लेख करण्यात आला आहे.
2023 मध्ये आशियातील अनेक भागांना भीषण उष्णता आणि उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. उन्हाळ्याच्या सुरुवातीला दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियातील प्रदीर्घ उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते. भारतही या घटनांपासून दूर राहिला नाही. भारतात एप्रिल आणि जून महिन्यात अतिउष्मा आणि उष्णतेच्या लाटेमुळे 110 लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. अहवालानुसार 1991 ते 2020 या कालावधीतील सरासरी तापमानाशी तुलना केल्यास पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये पृष्ठभागाजवळील तापमान एक अंश सेल्सिअसने वाढले होते. या भागात अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, जम्मू काश्मीर, लडाख आणि त्रिपुरा यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल, बिहार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि झारखंडच्या काही भागांचा समावेश आहे.
अहवालात 2023 मध्ये भारतात येऊ शकणार्या हवामान आणि अत्यंत गंभीर हवामान आपत्तींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ऑगस्ट 2023 मध्ये भारताने विक्रमी तापमान अनुभवले. तसेच याच महिन्यात पावसातही अनपेक्षित घट दिसून आली. भारतात 2023 मध्ये उशिरा सुरू झालेला कमकुवत मान्सून अनुभवायला मिळाला. त्यात सरासरीपेक्षा 94 टक्के पाऊस पडला (1971 ते 2020 पर्यंतचा हा सरासरी पाऊस होता)