आरोग्‍य : हर शख्स परेशान सा क्यूँ है?

आरोग्‍य : हर शख्स परेशान सा क्यूँ है?

जगातील 140 देशांनी 'आरोग्य हा मानवाचा मूलभूत हक्क असल्याचे' संविधानात कबूल केले असले, तरी केवळ चारच देशांनी याबाबतची आर्थिक तरतूद कशी करावयाची, याची नोंद केली आहे. आज जवळपास साडेचार अब्ज व्यक्तींना म्हणजे जगातल्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला आरोग्याच्या प्राथमिक सुविधाही उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आज (दि. 7 एप्रिल) जागतिक आरोग्य दिन. त्यानिमित्ताने…

सीने मे जलन, आँखो में तुफान सा क्यूँ है,
इस शहर में हर शख्स परेशान सा क्यूँ है…

प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी गायलेली आणि शहरयार यांची जयदेव यांनी संगीतबद्ध केलेली 'गमन' सिनेमातील ही गझल आजही अनेक समस्यांची आठवण करून देते. 7 एप्रिल हा दिवस 'जागतिक आरोग्य दिन' म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य आहे. 'चू कशरश्रींह, चू ठळसहीं' म्हणजेच 'माझे आरोग्य, माझा हक्क.' आजही अनेक व्यक्ती अचानकपणे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडतात. हृदयविकार हे माणसाच्या मृत्यूचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. वायू प्रदूषणामुळे आज श्वासागणीक एक मृत्यू होतो, म्हणजे जगात मिनिटाला 12 मृत्यू होतात. आपण आरोग्याबाबत जागरूक आहोत का? जोपर्यंत एखादी आपत्ती माझ्यापर्यंत किंवा माझ्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत ती माझी नाही, ही मानसिकता खर्‍या अर्थाने गंभीर स्वरूपाची आहे. बहुतांशाने आढळणारी ही मानसिकता बदलणार नाही, तोपर्यंत अस्वच्छता, कचरा, डास, वायू प्रदूषण, जल प्रदूषण याद्वारे होणारे संसर्गजन्य आजार जसे की, मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया आणि कावीळ, विषमज्वरसारखे जलजन्य आजार हे आपल्यातून हद्दपार होणार नाहीत.

'आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आत्मिक स्वास्थ्य' या जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येत आता कौटुंबिक, आर्थिक, व्यावसायिक स्वास्थ्य अशा अनेक संदर्भांची भर पडली आहे. त्याद़ृष्टीने प्रत्येकाने आपले पाऊल जबाबदारीने उचलणे आवश्यक आहे.

'माझे आरोग्य, माझा हक्क' असे जरी यावर्षीचे आरोग्यदिनाचे घोषवाक्य असले, तरी आपल्याला आपले आरोग्य सहजासहजी मिळणार नाही. कारण, जेव्हा आपण हक्काची भाषा करतो, तेव्हा त्याबरोबर जबाबदारीची जाणीवही हवी, हे विसरता येणार नाही.

आपण बाजारात जाऊन एखादी नवीन वस्तू विशेषतः मोबाईल, कॉम्प्युटर, कॅमेरा, फॅन, एसी, कुलर यासारखी इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतो, तेव्हा त्याबरोबर एक यूझर गाईड येतो. आपण त्यातील सूचनांनुसार ती वस्तू वापरतो. ती बिघडणार नाही, त्याच्या मेंटेनन्ससाठी वेगळा खर्च होणार नाही, याची काळजी घेतो. मोबाईलला तर स्क्रीन गार्ड आणि मोबाईल कव्हर वेगवेगळ्या डिझाईनचे आणि चांगल्या दर्जाचे घेतो. मोठी कार घेतली, तर त्याचे वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करावे लागते. त्यासाठी घसघशीत पैसे मोजावे लागतात. ठराविक किलोमीटर अंतरानंतर हे करावेच लागते आणि ते आपण आठवणीने करतो.

पण, मग आपल्या आरोग्याचे काय? एक तर आपल्या जन्मानंतर आपल्याला किंवा आपल्या पालकांना कोणतेही यूझर मॅन्युअल मिळत नाही. प्रत्येक जण आपापल्या वकुबानुसार आरोग्याच्या गोष्टी करत असतो. मुळात आरोग्य म्हणजे काय? हे किती जणांना नीटपणे ठाऊक असते, कुणास ठाऊक? बरे, आरोग्य हे आपोआप नीट राहत नसते. त्यासाठी आपल्याला वेगळे काही करावे लागते, हेही अनेकांच्या गावी नसते. आपल्या जबाबदार्‍या इथून सुरू होतात. आरोग्य म्हणजे काय हे जाणून घेणे, आपल्या आरोग्याची सध्याची स्थिती काय आहे, याची माहिती करून घेणे आणि ते बिघडले असेल, तर ते दुरुस्त करून पुन्हा बिघडू नये, यासाठी दक्षता घेणे या महत्त्वाच्या बाबी आहेत.

आपण वापरत असलेली एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि आपले शरीर याची सहज गंमत म्हणून तुलना केली, तरी आपले शरीर आपण नीट वापरतो का? त्याची काळजी आपण नीट घेतो का? याचा गांभीर्याने विचार केला, तर अनेकांच्या बाबतीत त्याचे उत्तर 'नाही' असे येईल.

अगदी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीदेखील बिघडल्या आहेत. आपल्या शेतात पिकवलेले आणि घरात डोळ्यांसमोर शिजवलेले सकस अन्न किती लोक दररोज खातात, हासुद्धा संशोधनाचा विषय ठरेल. केवळ शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातदेखील फास्ट फूडचे फॅड वाढले आहे. हॉटेलमधील, बेकरीतील पदार्थ, हवाबंद डब्यातील पदार्थ, शीतपेये, मेवा-मिठाई, आईस्क्रीम अशा पदार्थांची जणू रेलचेलच असते. अशा पदार्थांमुळे अनेक विकारांना आमंत्रण मिळते, हे आपण विसरतो. अनेकजण तंबाखू, मावा, गुटखा, सिगारेट, बिडी, दारू, गांजा, हुक्का, ड्रग्ज यांचा आस्वाद (!) घेतात. फास्ट फूड किंवा असे पदार्थ घेणारे अनेकजण डॉक्टरांना मात्र औषधांच्या साईड इफेक्टस्विषयी विचारतात, हा भाग वेगळा.

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायामाची गरज असते, हे माहीत असते; पण हा नियम अंमलात आणला जातो का? योगासनांचीसुद्धा तीच गत आहे. अनेकांना सकाळी लवकर उठावेसे वाटत नाही. 'लवकर निजे, लवकर उठे, तया आरोग्य-समृद्धी भेटे' हा मंत्र विसरलेले अनेकजण रात्री उशिरापर्यंत जागरण करतात. पुरेशी म्हणजे सात ते आठ तासांची विश्रांती घेत नाहीत. परिणामी, शरीरावर दुष्परिणाम होतात. मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर हा केवळ डोळ्यांना, मेंदूलाच नव्हे, तर एकंदर मानसिक आरोग्यासाठीच हानिकारक आहे, हे विसरता कामा नये. आनंद शोधता शोधता, आपण आरोग्य हरवून बसलो की काय, असे अनेकदा वाटते. व्हर्च्युअल जगात आनंद शोधणार्‍या व्यक्ती आजूबाजूला प्रत्यक्षात वावरणार्‍या माणसांच्या डोळ्यांत डोकवायला तयार नाहीत. जिथे माणसांशी बोलायला कुणाला सवड नाही, तिथे पशुपक्षी आणि झाडांशी हितगुज आणि स्पर्शाची भाषा करण्याचा सल्ला देणे, म्हणजे आजच्या 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या युगात वेडेपणाचे ठरेल. 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' ही प्रार्थना आपण उबुंटूचा म्हणजे सर्वांनी एकत्र जिंकण्याचा आणि आनंदी राहण्याचा नियम पाळण्याची मनाशी खूणगाठ बांधून नियमितपणे स्वतःसाठीच करायला हवी. मग कुठे तरी 'आहे रे' आणि 'नाही रे' वर्गातील दरी कमी होऊन, सर्वांना केवळ आरोग्याच्याच नव्हे, तर सर्वच सुविधा समान पातळीवर उपलब्ध होतील.

आरोग्याचा हक्क हा 'मूलभूत मानवी हक्क' म्हणून अधोरेखित करत असलो, तरी आज वास्तव काय आहे, हे पाहणे समायोचित ठरेल. प्रत्येक व्यक्तीला.. मग त्या व्यक्तीची आर्थिक, सामाजिक, भौगोलिक स्थिती कोणतीही असो, तिला आरोग्य आणि आरोग्यसुविधा मिळायलाच हव्यात.

जगातील 140 देशांनी 'आरोग्य हा मानवाचा मूलभूत हक्क असल्याचे' संविधानात कबूल केले असले, तरी केवळ चारच देशांनी याबाबतची आर्थिक तरतूद कशी करावयाची, याची नोंद केली आहे. आज जवळपास साडेचार अब्ज व्यक्तींना म्हणजे जगातल्या अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला आरोग्याच्या प्राथमिक सुविधाही उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

आज मानवजातीत अगदी युक्रेन-रशिया युद्धापासून एखाद्या चहाच्या टपरीवरील अवघ्या पन्नास रुपयांसाठी होणारा जीवघेणा हल्ला इथेपर्यंत, सर्व जगभर चाललेला असंख्य पातळीवरील संघर्ष कुठे तरी थांबायला हवा. कारण, युद्ध असो किंवा दहशतवाद, नैसर्गिक आपत्ती किंवा जागतिक तापमानवाढीची समस्या, कोरोनासारखी जगभर पसरलेली साथ असो किंवा डेंग्यू, मलेरियासारखे विकार… या सर्वांमुळे माणूस भयग्रस्त होतो. माणूस वेदनाग्रस्त होतो. तो अधिक संवेदनशील होतो. ज्यांना अशा आपत्तींना प्रत्यक्ष तोंड द्यावे लागते, त्यांच्या अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजाही भागत नाहीत. याचा आपण एक माणूस म्हणून विचार करणार आहोत की नाही? जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आरोग्याचा हक्क बजावताना, आपली जबाबदारीही महत्त्वाची आहे, हे लक्षात घेऊन, आरोग्याचा हक्क केवळ आपल्या एकट्याचा नव्हे, तर सार्‍या विश्वाचा आहे. एवढे जरी, यानिमित्ताने लक्षात घेतले, तरी आजचा हा 'आरोग्य दिन' कारणी लागला, असे म्हणता येईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news