पुढारी ऑनलाईन डेस्क : World Cup Semi-finals Umpires : विश्वचषक स्पर्धा शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. आता केवळ दोन सेमीफायनल आणि फायनल असे मिळून तीन सामने शिल्लक राहिले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 15 नोव्हेंबरला तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 16 नोव्हेंबरला उपांत्य फेरीचे सामने खेळले जाणार आहेत. फायनल 19 नोव्हेंबरला होणार आहे. या दरम्यान, इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC)ने सेमीफायनल मॅचसाठी पंचांची घोषणा केली आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणार्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे रॉड टकर आणि इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ हे मैदानी पंच म्हणून काम पाहणार आहेत. त्याचवेळी, या सामन्यात, जोएल विल्सन तिसरे आणि एड्रियन होल्डस्टॉक हे चौथे पंच असतील. सामनाधिकारी म्हणून अँडी पायक्राफ्ट काम पाहणार आहेत. यावेळी रिचर्ड केटलबरो भारताच्या बाद फेरीच्या सामन्यात अंपायरिंग करताना दिसणार नाहीत. रिचर्ड केटलबरो यांनी टीम इंडियाच्या गेल्या काही बाद फेरीच्या सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले होते. ज्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे चाहत्यांच्या मते रिचर्ड केटलबरो हे टीम इंडियासाठी अपशकुनी असल्याची त्यांच्यावर टीका झाली होती. (World Cup Semi-finals Umpires)
2019 च्या विश्वचषकात ओल्ड ट्रॅफर्ड येथे पावसाने प्रभावित झालेल्या दोन दिवसीय सामन्यात किवींनी 18 धावांनी विजय चाखला होता. त्या सामन्यात टकर हे तिसरे पंच होते. आता टकर भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यादरम्यान 100 व्या एकदिवसीय सामन्यात अंपायरिंग करेल. जानेवारी 2009 मध्ये त्याने पहिल्यांदा एकदिवसीय सामन्यात अंपायरिंग केले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात तिसरे पंच जोएल विल्सन, चौथे पंच एड्रियन होल्डस्टॉक आणि सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट असतील.
भारताचे नितीन मेनन आणि रिचर्ड कॅटलबरो ही जोडगोळी द. आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात मैदानी पंच म्हणून जबाबदारी सांभाळतील. तर ख्रिस गॅफनी तिसरे आणि मायकेल गॉफ चौथे पंच असतील. याशिवाय भारताचे जवागल श्रीनाथ या सामन्यात सामनाधिकारी म्हणून काम पहतील.
उपांत्य फेरी 1: भारत विरुद्ध न्यूझीलंड, बुधवार 15 नोव्हेंबर, मुंबई
मैदानावरील पंच : रिचर्ड इलिंगवर्थ आणि रॉड टकर
तिसरे पंच : जोएल विल्सन
चौथे पंच : एड्रियन होल्डस्टॉक
सामनाधिकारी : अँडी पायक्रॉफ्ट
उपांत्य फेरी 2 : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, गुरुवार 16 नोव्हेंबर, कोलकाता
मैदानावरील पंच : रिचर्ड केटलबरो आणि नितीन मेनन
तिसरे पंच : ख्रिस गॅफनी
चौथे पंच : मायकेल गॉफ
सामनाधिकारी : जवागल श्रीनाथ