आजपासून रंगणार विश्व बुद्धिबळ अजिंक्यपदाचा थरार

आजपासून रंगणार विश्व बुद्धिबळ अजिंक्यपदाचा थरार

अ‍ॅस्टाना/कझाकिस्तान, वृत्तसंस्था : जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच विद्यमान जगज्जेत्याशिवाय एखादी लढत होणार असून, फिडे मानांकन यादीतील दुसर्‍या स्थानावरील रशियाचा इयान नेपोम्नियाची व चीनचा तृतीय मानांकित डिंग लिरेन अजिंक्यपद मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील, अशी अपेक्षा आहे. विद्यमान विश्वविजेता मॅग्नस कार्लसन व पाचवेळचा विजेता विश्वनाथन आनंद यांच्याशिवाय खेळवली जात असणारी ही 2007 नंतरची पहिलीच अजिंक्यपद स्पर्धा असणार आहे.

सध्या नेपोम्नियाचीचे यलो रेटिंग 2,795 इतके आहे, तर लिरेन हा त्याच्यापेक्षा किंचित मागे 2,788 रेटिंगवर आहे. रशियाचा नेपोम्नियाची 2007 पासून ग्रँडमास्टर आहे, तर चीनचा लिरेन 2009 पासून ग्रँडमास्टर आहे.

नेपोम्नियाची व लिरेन यांच्यात आजवर 14 क्लासिकल चेस गेम्स झाले असून, नेपोम्नियाचीने त्यात 3 विजय मिळवले, तर 2 पराभव पत्करले आहेत. उर्वरित 9 लढती बरोबरीत राहिल्या आहेत. रॅपिड व ब्लित्झ गेमचा समावेश केल्यानंतर नेपोम्नियाची यात 11-5 फरकाने आघाडीवर राहिला असून, 11 सामने बरोबरीत राहिले आहेत.

यंदा मॅग्नस का खेळत नाही?

एरव्ही, जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदाच्या लढतीत विद्यमान विश्वविजेत्याचे स्थान निश्चित असते आणि त्याचा आव्हानवीर कॅन्डिडेटस् स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित केला जातो. कॅन्डिडेटस् स्पर्धेत जिंकणारा ग्रँडमास्टर जागतिक स्पर्धेच्या फायनलमध्ये विद्यमान जगज्जेत्याला आव्हान देतो. मात्र, यंदा मॅग्नस कार्लसनने आपला आव्हानवीर ग्रँडमास्टर अ‍ॅलिरेझा फिरोझा हा असेल तरच आपण ही लढत खेळू, असे जाहीर केले. वास्तविक, यासाठी फिरोझाने कॅन्डिडेटस् स्पर्धा जिंकणे आवश्यक होते; पण प्रत्यक्षात आठ स्पर्धकांमध्ये फिरोझाची कामगिरी अतिशय खराब स्वरूपाची राहिली आणि तो सहाव्या स्थानी फेकला गेला. साहजिकच, विश्व अजिंक्यपदाच्या लढतीत तो खेळणे शक्य नाही, हे स्पष्ट झाले. यादरम्यान, कार्लसनने विश्व अजिंक्यपदाच्या लढतीत काही साध्य करावे, असे काहीही बाकी राहिले नसल्याचे सांगत आपण ही लढत खेळणार नसल्याचा पुनरुच्चार केला.

कार्लसनने स्पर्धेतून माघार घेतल्याने याबद्दल नाराजीचे सूर साहजिकच होते. मात्र, अंतिम लढतीसाठी खेळाडू निश्चित करणे आवश्यक होते. त्यानुसार, मागील आव्हानवीर नेपोम्नियाची आणि डिंग लिरेन यांची लढत होत आहे. एखाद्या चिनी ग्रँडमास्टरने विश्व अजिंक्यपदाच्या लढतीत खेळण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ असून, लिरेनमुळेच फिडेने अर्जेंटिना, मेक्सिकोऐवजी कझाकला पसंती दिली.

द़ृष्टिक्षेपात दोन्ही ग्रँडमास्टर्स

इयान नेपोम्नियाची

जन्म : 14 जुलै 1990
जागतिक मानांकन : 2
वयाच्या चौथ्या वर्षी बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात
2000, 2002, 2003 मध्ये वयोगटात जेतेपदे
2002 मध्ये विश्व युवा गटात जेतेपद

डिंग लिरेन

जन्म : 24 ऑक्टोबर 1992
जागतिक मानांकन : 3
वयाच्या चौथ्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात
2009 मध्ये चीनचा 30 वा ग्रँडमास्टर ठरला
चायनीज चेस चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकलेली आहे

असा असेल स्पर्धेचा फॉरमॅट

अ‍ॅस्तानामधील विश्व बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या या लढतीत एकूण 14 सामने खेळले जातील आणि सर्वप्रथम 7.5 गुण घेणारा ग्रँडमास्टर नवा जगज्जेता ठरेल. प्रत्येक डावात पहिल्या 40 चालींसाठी 120 मिनिटे मिळतील, तर त्यापुढील 20 चालींसाठी 60 मिनिटांचा अवधी असेल. त्यानंतर 61 व्या चालीपासून प्रत्येक चालीला 30 सेकंदांची इंक्रिमेंट मिळेल. टाय झाल्यास रॅपिड चेस प्लेऑफ खेळवली जाईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news