सैन्य दलांतील महिलांना मिळणार सारख्याच प्रसूती रजांचा लाभ

सैन्य दलांतील महिलांना मिळणार सारख्याच प्रसूती रजांचा लाभ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : तिन्ही सैन्य दलांतील महिला सैनिक व महिला अधिकार्‍यांच्या प्रसूती रजा, देखभाल रजा आणि मूल दत्तक घेण्याच्या रजा यांच्यातील भेदभाव दूर करण्यात आला असून आता कोणत्याही पदावर असणार्‍या महिलांना सारख्याच रजा मिळतील, अशी घोषणा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केली.

संरक्षणमंत्र्यांनी याबाबत महत्त्वाचा निर्णय जारी केला. त्यानुसार लष्कर, नौदल आणि हवाई दलात कार्यरत महिला सैनिकांना त्यांच्या अधिकार्‍यांना  जितक्या रजा मिळतात, तेवढ्याच मिळतील. महिला सैनिकांच्या रजांच्या बाबतीतील नियमांची कक्षा विस्तारण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार आता तिन्ही सैन्य दलांतील कोणत्याही पदावर कार्यरत असणार्‍या महिलांना प्रसूती रजा, बालसंगोपन रजा आणि दत्तक रजा सारख्याच प्रमाणात मिळणार आहेत.

आतापर्यंत महिला अधिकार्‍यांना या रजा अधिक मिळत; तर सैनिक महिलांना मिळणार्‍या रजांचे प्रमाण कमी होते. सरकारने घेतलेल्या या रजांमुळे या बाबतीतील भेदभाव दूर झाला आहे.

याबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, सैन्य दलातील महिलांना राष्ट्रकर्तव्य बजावतानाच कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी पेलण्यास या निर्णयामुळे मदत मिळणार आहे.

नारी शक्तीला प्रोत्साहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्त्री शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी जाणीवपूर्वक उचललेल्या पावलांत तिन्ही सैन्य दलांत महिलांना सशस्त्र जवान म्हणून सामील करून घेण्याचा निर्णय घेतला. ही एक नवीन बदलाची सुरुवात असून महिला अग्निवीरांच्या भरतीने देशाच्या भौगोलिक, सागरी आणि हवाई सीमांच्या रक्षणात महिला पुरुषांच्या बरोबरीने तैनात करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news