NZ vs PAK : न्यूझीलंडची पाकवर ७१ धावांनी मात

NZ vs PAK : न्यूझीलंडची पाकवर ७१ धावांनी मात
NZ vs PAK : न्यूझीलंडची पाकवर ७१ धावांनी मात

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुझी बेट्सचे शतक आणि हॅना रोवेच्या पाच विकेट्सच्या जोरावर न्यूझीलंडने महिला विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात पाकिस्तानवर ७१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पाकचा हा सहावा पराभव असून त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

तत्पूर्वी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून यजमान न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. मात्र, त्यांची सुरुवात खराब झाली. त्यांची पहिली विकेट ३१ धावांवर पडली. सोफी डिव्हाईन १२ धावांवर बाद झाली. यानंतर सुझी बेट्सने अमेलिया केरसोबत दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी (६८) भागीदारी केली. केर १९ व्या षटकात २४ धावा काढून तंबूत परतली. त्याच षटकात एमी सॅटरथवेटही खाते न उघडता बाद झाली. यावेळी न्यूझीलंडची अवस्था ३ बाद १०० अशी झाली होती. यानंतर बेट्सने मॅडी ग्रीन (२३) सोबत ६० आणि ब्रुक हॅलिडे (२९) सोबत ५१ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी रचल्या. बेट्सने शतक पूर्ण करून तंबूत परतली. यानंतर काही अंतराने विकेट पडत गेल्या. खालच्या क्रमवारीत केटी मार्टिनने ३० धावांचे योगदान दिले. याचबरोबर न्यूझीलंडने ५० षटकांत ८ विकेट गमावून २६५ धावांपर्यंत मजल मारली. बेट्सने १३५ चेंडूत १४ चौकारांच्या मदतीने १२६ धावांची खेळी केली. तसेच ती वनडे क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण करणारी न्यूझीलंडची पहिली आणि जगतील चौथी महिला फलंदाज ठरली. बेट्सने तिच्या वनडे कारकिर्दीतील १२ वे शतक झळकावत १२६ धावांची शानदार खेळी साकारली. पाकिस्तानकडून निदा दारने ३ बळी घेतले.

लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ३९ धावा जोडल्या. ही भागीदारी फ्रान्सिस मॅकेने सिद्रा अमीनला १४ धावांवर बाद करून मोडली. दुसरी सलामीवीर मुनिबा अलीही २९ धावा करून बाद झाली. कर्णधार बिस्माह मारूफने थोडा वेळ संघर्ष केला. तिने ३८ धावा केल्या. निदा दारने संघाकडून सर्वाधिक ५० धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. त्यामुळे संपूर्ण षटके खेळूनही पाकिस्तानचा संघ ९ बाद १९४ धावाच करू शकला. हॅना रोवेने घातक गोलंदाजी करत पाकिस्तानच्या फलंदाजीला सुरुंग लावला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news