IND vs NZ : न्यूझीलंडची भारतावर ६२ धावांनी मात

IND vs NZ : न्यूझीलंडची भारतावर ६२ धावांची मात
IND vs NZ : न्यूझीलंडची भारतावर ६२ धावांची मात
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला वनडे विश्वचषक स्पर्धेच्या ८ व्या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा ६२ धावांनी पराभव केला (IND vs NZ). २६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ ४६.४ षटकात १९८ धावांवर सर्वबाद झाला. हरमनप्रीत कौरने (७१) सर्वाधिक धावा केल्या. तर मिताली राजने ३१ धावा केल्या. किवीजकडून ली ताहुहू आणि अमेलिया केर यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत किवी संघाने ९ गडी गमावून २६० धावा केल्या. अॅमी सॅटरथवेटने (७५) सर्वाधिक धावा केल्या, तर अमेलिया केरने ५० धावा केल्या. टीम इंडियासाठी पूजा वस्त्राकरने ३४ धावा देत ४ बळी घेतले. (IND vs NZ)

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. न्यूझीलंडची सलामीवीर सुझी बेट्स वैयक्तिक ५ धावांवर धावबाद झाली. येथून सोफी डिव्हाईन आणि अमेलिया केर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. डिव्हाईन ३५ धावा करून बाद झाली. तर ५० धावा करून अमेलिया राजेश्वरी गायकवाडची बळी ठरली. मॅडी ग्रीनने २७ धावा केल्या. एमी सॅटरथवेटनेही जबरदस्त फलंदाजी करत सर्वाधिक ७५ धावा केल्या, तर केटी मार्टिनही ४१ धावा करून बाद झाली. एका क्षणी न्यूझीलंड मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होता पण भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये जोरदार पुनरागमन केले. त्यामुळे न्यूझीलंडला ५० षटकांत ९ बाद २६० धावा करता आल्या. भारताकडून पूजा वस्त्राकरने ४ बळी घेतले. (IND vs NZ)

२६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. संघाने १० षटकात दोन महत्त्वपूर्ण विकेट गमावल्या. सलामीवीर स्मृती मानधना ६ आणि दीप्ती शर्मा ५ धावा करून बाद झाली. ली ताहुहूने यास्तिका भाटियाच्या खेळीला ब्रेक लावला आणि २८ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर तिला आपला बळी बनवले. कर्णधार मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांनी चौथ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी अमेलिया केरने मोडली आणि तिने मितालीला ३१ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद केले. पुढच्याच चेंडूवर रिचा घोषही खाते न उघडताच बाद झाली. अशाप्रकारे भारताचा निम्मा संघ शंभर धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतला. पण हरमनप्रीतने एका टोकाकडून धावा करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तिने काही जबरदस्त फटके मारले आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. हरमनप्रीतने ६३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७१ धावा केल्या. यानंतर आणखी काही विकेट पडल्या आणि भारताचा संपूर्ण डाव ४६.४ षटकांत १९८ धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंडकडून अमेलिया केर आणि ली ताहुहू यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धचा दहावा पराभव

महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत किवी संघाविरुद्ध भारताची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. दोन्ही संघांमध्ये विश्वचषक स्पर्धेत एकूण १३ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने २ आणि न्यूझीलंडने १० सामने जिंकले आहेत. १९९७ च्या स्पर्धेत खेळलेला एक सामना टाय झाला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news