नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : दुधाला बाजारभाव मिळावा आणि कांद्याची निर्यात पुन्हा सुरू करावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका प्रियंका शेळके यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तहसील कचेरीवर जनावरांसह महिला शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये जनावरांचा सहभाग असल्याने व गळ्यात कांद्याच्या माळा असल्याने हा मोर्चा लक्षवेधी ठरला. हातात दुधाच्या किटल्या घेऊन महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चात आगरच्या सरपंच नयना तांबे, शिरोली बुद्रुकच्या सरपंच वैशाली थोरवे, सीमा भोर, नीलम खरात, सोनाली पवार, अश्विनी पवार, आशा शेळके, शिल्पा शेळके, पांडुरंग शेळके, अभय वाव्हळ, राजू ढोमसे, गणेश वाव्हळ, धनगरवाडी गावचे सरपंच महेश शेळके, हर्षल जाधव, पप्पू डुकरे, गोकूळदास शेळके, ऋषिकेश शिंदे आदी शेतकरी सहभागी झाले होते.
सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला असून, शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करीत आहेत. परंतु सध्या दुधाचे बाजारभाव पडल्यामुळे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. दुसरीकडे खाद्याचे दर मात्र आकाशाला भिडले आहेत. सरकारने शेतकऱ्यांच्या या विषयांमध्ये तातडीने लक्ष घालावे अन्यथा शेतकरीवर्ग पुन्हा मोठे आंदोलन करेल, असा इशारा बाजार समितीच्या संचालिका प्रियंका शेळके यांनी सरकारला दिला.
या वेळी धनगरवाडीचे सरपंच महेश शेळके, शिरोली बुद्रुकच्याच्या सरपंच वैशाली थोरवे, गणेश वाव्हाळ, राजू ढोमसे आदींची भाषण झाले. रस्त्यात दूध ओतून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला. जुन्नरच्या नायब निवासी तहसीलदार सारिका रासकर यांना देण्यात आले.
हेही वाचा :